नुकताच अन्न दिन झाला. मात्र, त्या दिवशी वाटप करायला दुकानदारांकडे धान्यच नव्हते. यामागचे कारणही कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, काही ठिकाणांहून धान्य वाटपाला विलंबाची ओरड सुरू झाली. त्यानंतर दुकानदारांना विचारणा केली तर आम्हाला धान्यच मिळाले नसल्याने वाटायचे कुठून, असा त्यांचा सवाल होता. सध्या पुरवठा कंत्राटदारांकडून हमालांना वेळेवर हमाली दिली जात नसल्याने हा वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दुकानदारांकडूनही ओरड वाढल्याने प्रभारी पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी कंत्राटदारास धारेवर धरताच, काही रक्कम अदा झाल्यानंतर हमालांनी कामावर येण्याचे मान्य केले आहे. मात्र, हा प्रश्न पूर्णपणे सुटला नाही. काही रक्कम अजूनही मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात धान्याचा वेळेवर पुरवठा होत नसल्याचा प्रश्न कायम आहे. याबाबत अनेकदा ओरड झाली. मात्र, कधी पुरवठा विभाग, कधी वाहतूक कंत्राटदार तर कधी तहसीलच्या दिरंगाईचा फटका बसतो. पुरवठा विभागाने नियतन वेळेवर काढले, तरीही कंत्राटदाराने धान्याची वाहतूक केली की नाही, यावर नियंत्रण राहात नाही. जर कंत्राटदाराने वेळेत धान्य आणले, तर ते दुकानापर्यंत वेळेत पोहोचत नाही अथवा तहसीलकडून ई पॉस मशिनवर अपलोड होत नाही. या सर्वांचा फटका लाभार्थ्यांना बसतो.
चालू महिन्यात अंत्योदयच्या २९ हजार लाभार्थ्यांना जवळपास ९ हजार क्विंटल तर प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांना जवळपास ३० हजार क्विंटल धान्याचे वाटप करायचे आहे. याशिवाय मोफतचे महिन्याला चार हजार ३०० क्विंटल धान्य मिळते. एवढ्या सगळ्या धान्याची उचल आता १० जुलैनंतर होणार असेल, तर त्याचे वाटप या महिन्यात होईल का, हा प्रश्न आहे.
दुकानदारांचीही नाराजी
गोदामातील हमालांनी काम न केल्याने पुढची यंत्रणा ठप्प होते, म्हणून त्यांची हमाली दिली. मात्र, दुकानदारांनाही अजून हमाली दिली नसल्याने त्यांची नाराजी आहे. माल न उतरवून घेतल्यास त्यांना वेळेत वाटप करणे शक्य नसल्याने ते उतरवून घेतात. मात्र, हमाली वेळेत मिळत नाही, अशी त्यांची बोंब कायम आहे.
असे मिळते धान्य
अंत्योदय लाभार्थी २९ हजार ६३८
गहू ६,०९२ क्विंटल
तांदूळ ३,१५३ क्विंटल
प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी ७,०५,८२४
गहू १८,८०७
तांदूळ १२,५५०
प्रधानमंत्री गरीब कल्याण लाभार्थी ७.३४ लाख
गहू २,६१५ मे.टन
तांदूळ १,७४३ मे.टन
तांदळात येतेय चुरी
सध्या पुरवठा होत असलेल्या तांदळात चुरी ५० टक्क्यांपर्यंत येत असल्याची ओरड सुरू झाली आहे. नागपूरहून येणाऱ्या मालातच हा प्रकार घडत आहे. यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, हे कळायला मार्ग नाही. मात्र, यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच चुरी येत नव्हती, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.