हिंगोली : जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून काढण्यात येणाऱ्या दैनंदिन प्रेसनोटनुसार जिल्ह्यात कोरोनाने ३१७ जण दगावलेले असताना, राज्याच्या कोविड पोर्टलवर मात्र प्रशासनाकडून केवळ २७३ मृत्यूचीच नोंद झाली आहे. ४४ मृत्यूची नोंद मनुष्यबळाच्या अभावामुळे राहिल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाच्या मृत्यूच्या आकड्यांतील लपवाछपवी सध्या प्रचंड प्रमाणात गाजत आहे. रोज यावरून रणकंदन होताना दिसत आहे. तरीही राज्यातील अनेक जिल्ह्यातील नोंदींमधील तफावत अजून कमी झाल्याचे दिसत नाही. हिंगोली जिल्ह्यातही तीच बोंब आहे. रोजच्या प्रेसनोटमध्ये माहिती येत असली, तरीही राज्याच्या पोर्टलवर त्याची काही नोंद होत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या व मृत्यूच्या आकड्यांतील ही तफावत जिल्ह्याला कोरोनाच्या काळात मिळणाऱ्या मदतीवर तर परिणाम करणारी ठरणार नाही, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने कहर केला. यात मृत्यूचे आकडेही वाढले आहेत. मृत्यूचे हे तांडव मात्र पोर्टलवर नोंदवल्या जात नाही. त्यातच बाधित रुग्णांच्या आकड्यात आणि बरे झालेल्यांच्या आकड्यातही तफावत आहे. पोर्टलवर १६ हजार ६५९ जण बाधित आढळले, तर १४ हजार ३६९ जण बरे झाल्याचे म्हटले. प्रत्यक्ष जिल्ह्यात दिल्या जाणाऱ्या आकडेवारीनुसार १४९९० रुग्ण आढळले असून, १४१३० जण बरे झाले आहेत. पोर्टलवर सक्रिय रुग्ण २०१७ असून, प्रत्यक्षात ५४३ आहेत.
इतर आजारांच्या बळींची नोंद होईना
पोर्टलवर राज्यातील अनेक जिल्ह्यांतून इतर आजारांच्या बळींचीही नोंद असल्याचे दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यातही इतर आजारांनी बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरीही त्यांची नोंद होत नसल्याचे दिसत आहे.
जिल्हा रुग्णालयात वॉर रुम
पोर्टल अद्ययावत करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात वॉर रूम करण्यात आली होती. पाच संगणक, पाच ऑपरेटर व एक डॉक्टर देण्यात आला हातेा. मात्र लसीकरणासाठी जसजसे मनुष्यबळ लागेल, तसे ते तिकडे वर्ग केले. त्यामुळे या ठिकाणी नोंदी करण्याचे काम ठप्प झाले. परिणामी, आता ही तफावत वाढत चालली असल्याचे दिसत आहे.
नवीन भरतीची प्रतीक्षा
ही वॉर रूम चालविण्यासाठी नवीन भरती करण्यात येत आहे. आता नव्याने दहा डाटा एन्ट्री ऑपरेटर घेण्यात येत आहेत. पाच जिल्हा स्तरावर, तर पाचजणांना त्या त्या तालुक्यांना नियुक्ती देऊन तेथूनही या नोंदी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे पोर्टल कायम अपडेट राहणार आहे. प्रत्येक तालुक्यालाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
... तर फटका बसू शकतो...
जिल्ह्याच्या रुग्ण व मृत्यूचे आकडे चुकीचे पडल्यामुळे जिल्ह्याला मिळणारी मदत कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ती तीव्रताच पोर्टलवरून न दिसल्यास शासन मदतीचा हात आखडता घेईल, असे अनेकांना वाटते.
हिंगोली जिल्ह्याचे बाधितांचे व सक्रिय रुग्णांच्या आकड्यातील तफावत मात्र इतर जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यातील रुग्णाने उपचार घेतले अथवा मृत्यू झाला तरीही त्याची नोंद आपल्याच जिल्ह्याच्या नावे होत असल्याने असल्याचे सांगण्यात आले.
पोर्टल अपडेट करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही एका बैठकीद्वारे सूचना दिली आहे. तर यासाठीचे मनुष्यबळही तत्काळ नियुक्त करण्यास सांगितले आहे.
आपल्या जिल्ह्यात मनुष्यबळाच्या अभावामुळे पोर्टलवरील नोंंदी काही प्रमाणात करायच्या राहिल्या आहेत. मात्र नवीन मनुष्यबळ येत्या दोन दिवसांत येणार आहे. त्यानंतर पूर्ण माहिती अपडेट करण्यात येईल.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक
ही पहा आकड्यांतील तफावत
जिल्ह्यातील एकूण कोरोनामृत्यू ३१७
पोर्टलवरील नोंद २७३