हिंगोली : सद्य:स्थितीत खरिपात लागणारे सर्वच बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, कोणत्याही बियाणाचा तुटवडा जिल्ह्यात नाही. दुसरीकडे बियाणांचे दर गतवर्षीपेक्षा वाढल्याने शेतकऱ्यांत चलबिचलता असल्याचे पहायला मिळत आहे.
गत दोन-चार दिवसांपासून बियाणे, खते व इतर शेतीविषयक औजारे खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. जिल्ह्यात आजमितीस २०:२०:०:१३, १२: ३२:१६, १०:२६:२६ आणि डीएपी ही खते उपलब्ध आहेत. यामध्ये २०:२०:०:१३ आणि डीएपी या खताला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. दुसरीकडे बियाणांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सोयाबीनला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. बियाणांच्या दरामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये बियाणे खरेदी करताना चलबिचलता दिसून येत आहे. याकरिता काही शेतकरी घासघीस करीत आहेत. गतवर्षी सोयाबीनची ३० किलोची एक बॅग दोन हजार ८०० रुपयाना मिळत होती. ती आज तीन हजार ८०० रुपयांना मिळत आहे. विशेष सांगायचे झाल्यास मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून येत असलेले सोयाबीन निकृष्ट दर्जाचे आहे, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोणतेही बियाणे, खते विकत घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी दुकानदारांकडून रितसर पावती घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
...तर त्यांच्यावर कारवाई
जिल्ह्यात बियाणे, खतांचा सध्यातरी तुटवडा नाही. शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करतेवेळेस रितसर पावती घ्यावी. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. दुसरीकडे बुरशीनाशक बीजप्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. लिकिंगबाबत अजून तरी काही तक्रारी आल्या नाहीत. शेतकऱ्यांनी या संदर्भात तक्रारी केल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाईल.
- गोविंद दहिवडे, मोहीम अधिकारी, जि.प. हिंगोली
प्रतिक्रिया
बियाणे व खतांचा तुटवडा नाही. परंतु, हातात पैसा नाही. अजून तरी पेरणी सुरू केली नाही. मोठा पाऊस पडल्यानंतच पेरणी करायची आहे.
- विठ्ठल फोले, नागझरी
गतवर्षापेक्षा यावर्षी बियाणे व खते बाजारात आली आहेत. परंतु खते, बियाणे महाग झाल्याने ते घेणे परवडत नाही. खते, बियाणांची किंमत कमी व्हायला पाहिजे.
- पंडित लिंबोळे, पांगरी
पंधरा दिवसांपासून शेतकरी बियाणे, खते खरेदीसाठी येत आहेत. अजून तरी काही तुटवडा नाही. भविष्यात काही सांगता येत नाही. डीएपी व २०:२०:०:१३ या खताला मागणी आहे.
शुभम मुंदडा, कृषी दुकानदार
जिल्ह्यात बियाणांचा तुटवडा नाही. बियाणे महाग झाल्याने शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. ते त्यात घासघीस करीत आहेत.
- आनंद निलावार, कृषी दुकानदार