- इस्माईल जहागिरदारवसमत (जि. हिंगोली) : तालुक्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मात्र भूकंपाची कुठेही नोंद झाली नसल्याचे सांगितले.
भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याचे वसमत तालुक्यात जाणवत आहे. गत महिनाभरात भूकंपाचा हा तिसरा धक्का असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबरोबर अधून-मधून भूकंपाचे सौम्य धक्केही बसत आहेत. भूकंपाचे छोटे-मोठे हादरे बसणे हे नागरिकांच्या अंगवळणीच पडले आहे. वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी या तिन्ही तालुक्यांना सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांत भूकंपाचे तीन वेळेस धक्के जाणवले आहेत. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:१५ वाजेदरम्यान तालुक्यातील अनेक गावांत भूगर्भातून आवाज आल्याचे नागरिकांनी सांगितले. भूगर्भशाास्त्र विभागाने हा प्रकार लक्षात घेऊन या भागात पाहणी करावी व नेमके भूकंपाचे केंद्र कुठे आहे हे शोधून काढावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.