हिंगोली : शहरानजीक असलेल्या कारवाडी ग्रामपंचायतीत मासिक सभेस का बोलावले नाही, या कारणावरून वाद घालत ग्रा.पं.सदस्याने सरपंचास ढकलून देत त्यांच्या पती व मुलास मारहाण केली. तसेच उपसरपंचास जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी गुन्हा हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे.
याबाबत उपसरपंच कपिल शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे. कारवाडी येथे मंगळवारी दुपारी १२.३० वाजता मासिक सभा सुरू असताना सरपंच प्रियंका खरात, उपसरपंच कपिल शेवाळे, ग्रामसेवक व सदस्य हजर होते. त्याच वेळेस तेथे ग्रा.पं.सदस्य रमेश जळबाजी वाघमारे, बालाजी अप्पाजी टोम्पे हे तीन अनोळखी व्यक्तींना सोबत घेत आले. त्यांनी सरपंच प्रियंका खरात यांचे पती शिवाजी यांना मार्च महिन्याच्या बहुमत असतानाही आम्हाला मासिक सभेस आम्हाला का बोलावले नाही, असा जाब विचारला तसेच. मात्र, त्यांना तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागवून घ्या, असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे संतप्त होत बालाजी टोम्पे यांनी शिवाजी खरात यांच्या श्रीमुखात भडकावली. तसेच त्यांचा मुलगा ओमसाई याने माझ्या वडिलांना का मारले, तुमच्याविरुद्ध कार्यवाही करतो, असे म्हटल्याने बालाजी टोम्पेने त्यालाही जिवे मारण्याची धमकी दिली. सरपंच प्रियंका खरात भांडण सोडविण्यास गेल्या असता त्यांना रमेश वाघमारेने ढकलून दिले. तसेच कपिल शेवाळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. अन्य अनोळखींच्या मदतीने ओमसाई खरात यास जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात मारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याबाबत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
कारवाडी कायम चर्चेतकारवाडी ग्रामपंचायत कायम चर्चेत असते. याआधीही कारवाडीच्या महिला सरपंचांवर हल्ला करण्यात आला होता. आता तर थेट ग्रामपंचायतचे कार्यालयच भांडणाचे ठिकाण बनल्याचे चित्र आहे.