हिंगोली: नको असलेली गर्भधारणा व इतर कारणांमुळे जिल्हा रुग्णालयात २०१९ मध्ये ७५, २०२० मध्ये ८१ तर २०२१ मध्ये ५५ असे कोरोना काळात २११ गर्भपात झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. नको असलेली गर्भधारणा, गर्भाशयातील काही दोष, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अयशस्वी होणे या व इतर कारणांनी होणारा गर्भपात असे अनेक कारणे सांगता येतात. जिल्हा रुग्णालयात जे गर्भपात करण्यात आलेले आहेत ते महिलांच्या मर्जीनुसारच केले असल्याचेही जिल्हा रुग्णालयाने स्पष्ट केले. दुसरीकडे कोरोनामुळे गर्भवती महिलांच्या बाळाला मात्र काही त्रास झालेला नाही, असे प्रसूतीतज्ज्ञांनी सांगितले.
गर्भपाताची आकडेवारी
जिल्हा रुग्णालय
२०१९-७५
२०२०- ८१
२०२१ - ५५
गर्भ असताना कोरोना झाला तर..
गर्भ असताना एखाद्या महिलेला कोरोना झाला तर त्या मातेने घाबरुन जावू नये. लगेच फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करुन घ्यावी. फॅमिली डॉक्टराच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत रहावे. गर्भवती महिलांनी लसीकरण करुन घेतले तर चालेल असे शासनाने व आरोग्य विभागाने सांगितले आहे. तेव्हा कोणत्याही महिलेने कोरोना झाल्यानंतर घाबरुन जावू नये, गरोदार मातेच्या बाळाला कोणतीही इजा होणार नाही, असेही आरोग्य विभागाने कळविले आहे.
प्रतिक्रिया
गर्भपात करण्याची अनेक कारणे असू शकतात. जिल्हा रुग्णालयात शासनाच्या वतीने मोफत गर्भपात केला जातो. परंतु यासाठी गर्भवती महिलेची संमती ितितकीच आवश्यक असते.
अनावश्यक गर्भधारणा होऊ नये, यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कुटुंबकल्याण कार्यक्रमातंर्गत विविध साधने उपलब्ध आहेत. जसे कॉपर टी, गर्भनिरोधक गोळ्या आदीचा समावेश आहे. गर्भपातासंदर्भात वेळोवेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन घेतले जाते.
-डॉ. रमेश कुटे, प्रसूती व स्त्रीरोग विभाग प्रमुख.