प्रवाशांना ना मास्क, ना सामाजिक अंतराचे राहिले भान
हिंगोली : रेल्वे गाड्यांना सद्यस्थितीत जनरल डबे नसल्यामुळे प्रवाशांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे आरक्षित डब्यांमध्ये पाय ठेवायला देखील जागा मिळत नाही. त्यातच कोरोना महामारी कमी झाल्याचे पाहून अनेक प्रवाशांनी मास्क खिशातच ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.
मार्च २०१९ पासून कोरोनाने सर्वत्र कहर केला. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून पॅसेंजर रेल्वे बंद करून एक्स्प्रेस रेल्वेच सुरू ठेवल्या आहेत. जिल्ह्यात पूर्णा ते अकोला ‘डेमो’ पॅसेंजर म्हणून सुरू केली असली तरी, भाडे मात्र प्रवाशांकडून एक्स्प्रेसचेच घेतले जाते. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे कठीण बनले आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खरेदीसाठी शहराच्या ठिकाणी यावे लागत आहे.
डब्यात विक्रेत्यांची गर्दी
पॅसेंजर गाडी नसल्यामुळे सर्व एक्स्प्रेसना गर्दी राहू लागली आहे. प्रवाशांसोबत छोटे विक्रेतेही डब्यात गर्दी करताना दिसून येत आहेत. खरे पाहिले, तर अशावेळी रेल्वे प्रशासनाने त्यांना डब्यात येण्यास मज्जाव करायला पाहिजे. परंतु, रेल्वे प्रशासन मज्जाव करत नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
सर्वच गाड्यांमध्ये स्थिती सारखीच
हिंगोली रेल्वे स्थानकावरून नरखेड ते काचीगुडा, पूर्णा ते अकोला, कोल्हापूर ते नागपूर अशा जवळपास पाच ते सहा एक्स्प्रेस रेल्वे गाड्या धावतात. आजमितीस ‘हमसफर’ एक्स्प्रेस रेल्वे सोडली, तर सर्वच गाड्यांना प्रवाशांची गर्दी राहत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या तरी एक्स्प्रेस सुरू राहणार...
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. परंतु, सध्या तरी एक्स्प्रेस रेल्वेच सुरू आहेत. सणासुदीचे दिवस असल्यामुळे एक्स्प्रेसनाही गर्दी वाढू लागली आहे. कोरोना महामारी संपली नसल्यामुळे प्रवाशांनी मास्क घालूनच प्रवास करावा.
- रामसिंग मिना, स्टेशन मास्टर, हिंगोली
११९१