कळमनुरी शहरातील नाईकवाडी मोहल्ला भागातील जावेद खान सिराज खान यांचे हिंगोली रोडवरील सोमाणी पेट्रोल पंपाजवळ वेल्डिंगचे दुकान आहे. त्यांनी २२ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकानाबाहेर लोखंडी खिडक्या व अँगल साखळीने बांधून ठेवले होते. २३ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले असता त्यांना दुकानाबाहेर असलेल्या खिडक्या व अँगल आढळून आले नाही. यावरून चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी २६ जुलै रोजी कळमनुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध तक्रार दिली आहे. तपास पोलीस हवालदार वरणे करीत आहेत.
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील २८ वर्षीय व्यक्तीचा दारूच्या नशेत विषारी औंषध पिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली. कैलास विठ्ठलराव भाले (रा. येडशी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. उमरदरा शिवारात दारूच्या नशेत विषारी औषध पिल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संदीप विठ्ठलराव भाले (रा. माळधावंडा) यांच्या खबरीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार जी.एच. शेख करीत आहेत.
दारू पिण्यास पैसे न दिल्याने मारहाण
हिंगोली : दारू पिण्यास पैसे का देत नाही, या कारणावरून महिलेस शिवीगाळ करून थापडाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २६ जुलै रोजी वसमत शहरात घडली. याप्रकरणी कल्पना राजू खरे (रा. आंबेडकरनगर वसमत) यांच्या फिर्यादीवरून राजू जयराम खरे याच्याविरूद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली. तपास पोलीस नाईक भगीरथ संवडकर करीत आहेत.
मुलाने बापाला ढकलून दिले
हिंगोली : मुलाने वडिलास ढकलून देत डोक्याला मुक्कामार दिल्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वसमत तालुक्यातील मोहम्मदपूर वाडी येथे २४ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गणेश धोंडिबा घोंगडे यांच्या फिर्यादीवरून मिलिंद गणेश घोंगडे याच्याविरूद्ध कुरूंदा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार नेव्हल करीत आहेत.