- विश्वास साळुंकेवारंगाफाटा (जि. हिंगोली): कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथे एका शेतकऱ्याच्या घरात धाडसी चोरी करून जवळपास १८ तोळे सोने व साडेतीन लाखांच्यावर रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना १० जुलै रोजी मध्यरात्री घडली.
वडगाव येथील गोविंद विठ्ठल मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार १० जुलैच्या मध्यरात्री घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश करीत कपाटातील १८ तोळे सोने व ३ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. सदर घटना घरच्यांना ११ जुलै रोजी पहाटे कळाली. त्यावेळी घरात एकच गोंधळ उडाला. यानंतर घरच्यांनी आखाडा बाळापूर पोलिसांना चोरी झाल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार शेख बाबर, गणेश लेकुळे, डोंगरकड्याचे बीट जमादार नागोराव बाबळे, पूंजाजी गायकवाड, शिवाजी पवार,प्रभाकर भोंग, श्वान पथक व ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. श्वान पथकाने घरापासून काही अंतरापर्यंत माग काढला. परंतु चोरट्यांचा शोध काही लागला नाही.
अकरा दिवसांमध्ये चोरीची तिसरी घटना...दरम्यान, मागील अकरा दिवसांमध्ये चोरीची ही तिसरी घटना घडली आहे. १ जुलै रोजी दांडेगाव येथील महादेव मंदिरात दानपेटी फोडून रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती. एप्रिल २०२३ मध्ये कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील नितीन साळुंके या शेतकऱ्याच्या घरातही अशीच धाडसी चोरी झाली होती. परंतु अद्याप त्या चोरीचा तपास लागला नाही.