हिंगोली : कोरोनाच्या काळात घरफोडीच्या घटना कमी होतील, अशी शक्यता होती. तसे कडक लॉकडाऊनच्या काळात घरफोडीच्या घटनांना आळाही बसला होता. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच चोरट्यांनी वर्षभराचा कोटा पूर्ण करीत कसर भरून काढली.
मागील वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गतवर्षी कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. आताही मार्च महिन्यापासून संचारबंदी लागू आहे. कोरोनाच्या काळात चोरीच्या घटनांना आळा बसेल, असे वाटत होते. तसेच कडक लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांचा उपद्रव कमी झाला होता. मात्र त्यानंतर लॉकडाऊन शिथिल होताच नागरिक घराबाहेर पडल्याने चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे चोरीच्या घटनांत वाढ होत गेली. २०१९ मध्ये जिल्ह्यात घरफोडीच्या ९० घटना घडल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्येही ९० घटना घडल्या; तर २०२१ मध्ये २३ एप्रिलपर्यंत घरफोडीच्या २० घटना घडल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिक पूर्णपणे घरी थांबत होते. त्यामुळे चोरट्यांना चोरी करता आली नाही. परिणामी चोरीच्या घटनांत घट झाली. त्यानंतर मात्र लॉकडाऊन शिथिल होत गेल्याने चोरट्यांनी आपला उपद्रव सुरू करीत वर्षभराची कसर भरून काढली.
बलात्काराच्या घटना रोखण्यात यश
कोरोनाच्या काळातही चोरट्यांनी कसर भरून काढली असली तरी जिल्ह्यात बलात्काराच्या घटनांत घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात बलात्काराच्या १८ घटना घडल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्ये यात २ ने घट होत बलात्काराच्या घटनांचा आकडा १६ वर आला; तर २०२१ मध्ये फेब्रुवारीपर्यंत बलात्काराच्या दोन घटना घडल्या होत्या. कोरोनाकाळात बलात्काराच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
प्रतिक्रिया...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिक दिवसभर घरी थांबत होते. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली होती. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच बाहेर रहदारी वाढली. परिणामी चोरटेही सक्रिय झाल्याने चोरीच्या घटना पुन्हा वाढल्या. आता चोरीच्या घटनांना आळा बसला आहे.
- उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली
महिला अत्याचारांच्या घटनांतही घट
कोरोनाकाळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात महिला अत्याचारांच्या २६२ घटना घडल्याची नोंद आहे; तर २०२० मध्ये यात घट होत १९५ अत्याचाराच्या घटना घडल्या. त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत १४ घटनांची नोंद पोलिसांकडे आहे.