हिंगोली: मोबाईल टॉवरच्या तांब्याचे केबल व सोलार पॅनलची चोरी करून २ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरटयांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून केबल व सोलार पॅनलसह एक पीकअप वाहन १२ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली
हिंगोली तालुक्यातील बळसोंड भागातून सी.जी. कन्ट्रक्शन जीओ टॉवरचे कार्यालय परिसरातून ११ जुलै रोजी चोरटयांनी ६२ हजारांचे मोबाईल टॉवरचे तांब्याचे केबल व २ हजार ५०० रूपये किमतीची दोरी चोरून नेली होती. तसेच याच दिवशी वसमत तालुक्यातील दरेगाव येथून १ लाख ४० हजार रूपये किमतीचे १४ सोलार पॅनलचीही चोरी झाली होती. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण व कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यावरून पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांनी तपास सुरू केला होता.
या घटनेतील चोरटे हे औंढा ना. तालुक्यातील येळी येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने गंगाधर नारायणराव सांगळे व बालाजी विठ्ठल घुगे (दोघे रा. येळी) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी दोन्ही ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी तांब्याचे केबल, दोरीचे बंडल, १४ सोलार पॅनल तसेच एक पीकअप वाहन असा एकूण १२ लाख २ हजार ५०० रूपयांचा मुदृदेमाल जप्त केला. दोघांनाही हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, विठृठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, दत्ता नागरे यांच्या पथकाने केली.