- हबीब शेखऔंढा नागनाथ ( हिंगोली ) : तालुक्यातील सारंगवाडी येथे संतश्रेष्ठ श्री सारंगस्वामी महाराज यांच्या यात्रेनिमित्त आज, गुरुवारी महाराष्ट्रासह परराज्यातील हजारो भाविक दाखल झाले. यावेळी भल्या पहाटे हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून यात्रेचे वैशिष्ट्य असलेल्या भाजीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदा १४० क्विंटल भाजी अन् २० क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद बनविण्यात आल्याची माहिती यात्रा आयोजन समितीने दिली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथे डोंगरावर वीरशैव समाज बांधवांचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सारंग स्वामी महाराज यांचे समाधी स्थळ आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येपासून याठिकाणी मोठी यात्रा भरते. या यात्रेत संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी वाटप केल्या जाणाऱ्या भाजीच्या प्रसादाचे विशेष महत्त्व आहे. ही भाजी खाल्ल्याने वर्षभर रोगराई होत नाही, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. त्यामुळे भाजीचा प्रसाद घेण्यासाठी राज्यासह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात येथे भाविक येत असतात.
यंदा अखंड शिवनाम सप्ताह व परमहस्य ग्रंथराज पारायण सोहळ्यापासून संतश्रेष्ठ सारंगस्वामी यात्रेस सुरुवात झाली. बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी सायंकाळी प्रभूलिंग महाराज यांच्या उपस्थितीत श्री सारंगस्वामी महाराजांची पालखी मिरवणूक व दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थोरलामठ संस्थान वसमत व गिरगाव, सातेफळ, वसा, हयात नगर, फुलकळस, पिंपराळा, सेलू, कुरुंदवाडी, ताडकळस आदी ठिकाणांहून आलेल्या जवळपास २५ ते ३० पायी दिंड्यासह हजारो भाविक पालखी सोहळ्यात दाखल झाले होते. १६ जानेवारी रोजी श्रींच्या समाधीस रुद्राभिषेक करून कीर्तन व धर्मसभेनंतर सकाळी ९ वाजेच्या दरम्यान यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या भाजी महाप्रसाद वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली.
महाप्रसादात भाजीचे वाटपजवळपास चाळीस प्रकारची पालेभाजी, फळभाजी, कंदमुळे यांचा समावेश असलेल्या १४० क्विंटल भाजी तर २० क्विंटल पोळ्याचे यावेळी वाटप करण्यात आले. भाजी महाप्रसादाच्या सेवनाने वर्षभर रोगराई होत नाही अशी गाढ श्रध्दा असल्याने हजारो भाविकांनी रांगेत लागून भाजी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे डोंगराळ भागातील सारंगवाडी परिसर गजबजून गेला होता. भाजी महाप्रसादासाठी सारंगस्वामी यात्रा कमिटी, विश्वस्त समिती, वीरशैव समाज बांधव तसेच गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.
तगडा पोलिस बंदोबस्तयात्रेदरम्यान औंढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या वतीने तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये उप विभागीय पोलिस अधिकारी भुसारे, पोलिस निरीक्षक जी एस राहीरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांच्या सह साठ पोलिस अंमलदार व दोन आर सी पी प्लाटून बंदोबस्तात हजर होते.