लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काही दिवसांपूर्वी जि.प.च्या जलव्यवस्थापन समितीत ठेवण्यात आलेल्या ७९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना नाहरकत देण्याच्या ठरावाच्या इतिवृत्ताला आज शिक्षण सभापती संजय देशमुख यांनी विरोध दर्शविला. तसे पत्रही प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.आज जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सभापती संजय देशमुख, सुनंदा नाईक, रेणूका जाधव आदींच्या उपस्थितीत जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्ताला मान्यतेचा ठराव ठेवला होता. त्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा आढाव्यासह ९ ते १0 विषय होते. यातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयाच्या ७९ कामांसाठी नांदेडच्या जिल्हा जलसंपदा अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग नांदेडकडील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधारे व साठवण बंधाºयांच्या कामांना ना-हरकत देण्याच्या ठरावावर मात्र सभापती संजय देशमुख यांनी आक्षेप घेतला. १ ते १00 एकरपर्यंत सिंचनक्षमता असलेली ही कामे जि.प.च्या लघुसिंचन विभागामार्फत करणे शक्य आहे. त्यामुळे शासनाने इतर विभागांना निधी देण्याऐवजी जि.प.च्या लघुसिंचनलाच यासाठी निधी दिला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. जर जि.प.च्या मर्यादेतच ही कामे असतील तर ती इतर विभागांकडून करून घेत जि.प.च्या अधिकारावर गंडांतर आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. इतर सदस्य मात्र शांत होते. यापूर्वीच्या सभा सचिवांनीही १ ते १00 एकरपर्यंतची कामे जिल्हा परिषदच करू शकते, हे का मांडले नाही, असा सवालही त्यांनी केला.यापूर्वीच्या सभेत हा ठराव जि.प.सदस्य अंकुश आहेर यांनी मांडला होता. तर जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी त्यास अनुमोदन दिले होते. विशेष म्हणजे ही कामे सिंचन अनुशेषातून होणार असल्याचे सांगून आ.तान्हाजी मुटकुळे हे जि.प.ची नाहरकत मिळण्यासाठी प्रयत्नशील होते.या योजनेतील कामे अजून मंजूर होणेच बाकी आहे. तत्पूर्वीच अधिकाराच्या मुद्यावरून हा प्रश्न पेटला आहे. उद्या या मुद्याला राजकीय वळण मिळाल्यासही नवल नाही. मात्र या एकाच प्रकाराची चर्चा जि.प.त होताना दिसून येत होती.
‘त्या’ बंधा-यांना जि.प. त विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:25 PM