हिंगोली : २०२१ मधील उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून केवळ दीडशे ते सव्वादोनशे रुपयेच खात्यात जमा होणार असले तरी पालकांना मात्र हजार रुपयांचे खाते काढावे लागणार आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील बँकांतून विविध योजनेतील लाभार्थींना रक्कम वाटपाचे काम सुरू आहे. शेतकरीही पीक कर्जासाठी बँकात चकरा मारीत आहेत. त्यामुळे बँकांत गर्दी पहावयास मिळत आहे. शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. जमा झालेल्या बँक खात्याचा तपशील जिल्हास्तरावर ९ जुलैपर्यंत द्यायचा आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात उन्हाळ्यातील ३५ दिवसांचे शालेय पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम जमा होणार आहे. ही रक्कम दीडशे ते सव्वा दोनशेपर्यंत जाते. २०१९-२० नुसार जिल्ह्यात १ लाख ६० हजार १६३ एवढे लाभार्थी विद्यार्थी आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे यापूर्वी खाते उघडण्यात आले असले तरी पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांचे खाते नव्याने उघडावे लागणार आहे. त्यात दीडशे ते सव्वा दोनशे रुपयांसाठी पालकांना बँक खाते उघडण्यासाठी खात्यावर हजार रुपये जमा करावे लागणार आहे. त्यात खाते काढण्यासाठी विद्यार्थ्यांनाही बँकेत न्यावे लागणार आहे. त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बँक खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये
शालेय पोषण आहाराच्या किमतीएवढी रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. पहिली ते पाचवीसाठी ३५ दिवसांचे केवळ १५६ रुपये तर सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या खात्यावर २३४ रुपये जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. एवढी रक्कम घेण्यासाठी हजार रुपयांचे बँक खाते काढावे लागणार आहे. झीरो बॅलन्सवर खाते काढण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, बँका झीरो बॅलन्स खाते उघडण्यासाठी फारशा उत्सुक नसतात.
पालकांची वाढली डोकेदुखी
शालेय पोषण आहारासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचा निर्णय चांगला आहे. मात्र खाते उघडण्यासाठी खात्यात हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या पालकांनी ही रक्कम कोठून आणावी ?
- प्रकाश काशीदे, वसमत
कोरोनामुळे अगोदरच अनेक पालकांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. त्यात दीडशे रुपयांसाठी हजार रुपयांचे बँक खाते उघडावे लागणार आहे. त्यापेक्षा पालकांच्या खात्यातच ही रक्कम जमा झाल्यास खर्चही वाचेल.
- संभाजी पुलाते, सापळी
पालकांच्या खात्यात रक्कम जमा करावी
सध्या कोरोनामुळे बँक खाते उघडण्यासाठी विविध अडचणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही रक्कम पालकांच्या खात्यात जमा झाल्यास योग्य होईल, असे मतही काही शिक्षकांतून व्यक्त होत आहे. बहुतांश पालकांचे खाते काढलेले असते.
कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थी (२०१९-२० नुसार)
हिंगोली - ३३३७५
वसमत - ४३२६४
कळमनुरी - २९७२७
औंढा ना. २३१२८
सेनगाव - ३०६६९
पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना मिळणार - १५६
सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना मिळणार - २३४