शिरडशहापूर(जि.हिंगोली) : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या महापोळ्यात शनिवारी दिवसभरात हजारो बैलजोड्या दाखल झाल्या. विदर्भासह संपूर्ण मराठवाड्यातून गोरखनाथाचे आपल्या बैलाना दर्शन घडविण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळ परिस्थिती असतानाही गर्दी केली होती.
वाई गोरखनाथ येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या करीला महापोळा म्हणजेच बैलांची यात्रा भरते. वाई येथील गोरखनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी मराठवाड्याच्या विविध भागातून बैलजोड्या येत असतात. पोळ्याचा सण आटोपल्यानंतर मध्यरात्रीनंतर शेतकरी आपापल्या बैलजोड्या, ढोल-ताशांच्या गजरात नाचत घेऊन वाईकडे प्रयाण करतात. दरवर्षी ५० ते ६० हजार बैलजोड्या येथे दाखल झाल्या. गोरखानाथाचे दर्शन घेतल्याने वर्षभर बैल ठणठणीत राहतो, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ वसमत तालुक्यातच ही ऐतिहासिक बैलांची यात्रा (महापोळा उत्सव) भरविली जाते.
दरवर्षी महापोळा उत्सव साजरा करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने यात्रा समिती स्थापन केली जाते. हा उत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदारी या समितीची असते. बैलजोड्या घेऊन येणाऱ्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था संस्थानच्या वतीने मोफत करण्यात येते. जवळपास २० ते २५ क्विंटल भाताचा महाप्रसाद वाटला जातो. तसेच गावात तीव्र पाणीटंचाई असताना सुद्धा ठिकठिकाणी पाण्याचे टँकर ठेवण्यात आले आहे. पूर्वी दरवर्षी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना मोफत चारा किंवा ढेप पुरविली जात होती; परंतु गेल्यावर्षीपासून शासनाची ही योजना बंद करण्यात आल्यामुळे जनावरांची हेळसांड होत आहे. बैलजोडी घेऊन येणाऱ्यांचे खातेक्रमांक, आधारकार्ड, फोटो दिल्यास त्यांच्या खात्यावर तुरळक रक्कम जमा करण्यात येईल, असे जि.प.च्या वतीने संस्थान मंडळास सांगण्यात आले आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेऊन वसमत टि पॉर्इंट ते नागेशवाडीपर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. पशु वैद्यकीय विभागाच्या वतीने बैलांची मोफत तपासणी व लसीकरण करण्यासाठी शिबीर घेण्यात आले. यावेळी पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. तोटावार, डॉ.सूर्यवंशी, डॉ.गायबोधने, डॉ. दानमोटे, डॉ.कुंधारे, डॉ. गाडेबोले व सर्व परिचर आदींनी बैलावर औषधी उपचार करण्यात आले.
महापोळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपाधिक्षक अ.गणी खान, पोलीस उपनिरीक्षक सदानंद येरेकर, फौजदार नेटके, सपोनि इंगोले, यांच्या मार्गदर्शनासाठी कुरूंदा येथील पोलीस कर्मचारी व राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. महापोळा शांततेत पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष धूळबाराव कदम, सोबराव कदम, सरपंच नरहरी पांचाळ, गुलाबराव कदम, बालाजी मगर, बाबुराव कदम, गोविंद कदम व यात्रा उत्सव कमेटीचे सर्व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.