हिंगोली : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे सुरू केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी समाज बांधव आज रवाना झाले आहेत.
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या प्रमुख मागणीसाठी इतर कुणालाही ओबीसीतून आरक्षण देवू नये, यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी बांधव शेकडो वाहनांतून आज सकाळी वडीगोद्रीकडे रवाना झाले आहेत.
हिंगोली येथे यापूर्वीही ओबीसींचा महाएल्गार मेळावा झाला होता. या मेळाव्यालाही समाज बांधवांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती. त्यानंतर आता पुन्हा ओबीसी समाज या आंदोलनासाठी एकवटला आहे. हिंगोली येथील जि.प.च्या मैदानावर सकाळपासूनच विविध भागातून येणारे समाज बांधव जमत होते. विविध पक्षात असलेली मात्र समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र आलेले नेतेमंडळीही जमली होती. या आंदोलनासाठी शेकडो वाहनांतून ही मंडळी साडेदहाच्या सुमारास रवाना झाली.