हिंगोली : मागील बारा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे फरार तीन आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तिघाही आरोपींना वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपींना अटक करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले, अशी माहिती स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार यांनी मंगळवारी ( दि. ४ ) दिली.
सविस्तर माहिती अशी की विविध गुन्ह्यातील हे तीन आरोपी मागील अनेक वर्षांपासून फरार होते. पोलीस तपास करूनही त्यांचा शोध लागत नव्हता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या तिघांना जेरबंद केले आहे. हिंगोली शहर ठाण्यात २००८ रोजी कलम ४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी रवि उर्फ काळ्या पि. कमल्या चव्हाण हा मागील अनेक वर्षांपासून फरार होता. न्यायालयाने देखील सदर आरोपीस फरारी घोषित केले होते. मंगळवारी रवि उर्फ काळ्या चव्हाण यास मोठ्या शिताफीने रिसोड येथील त्याच्या राहत्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली व हिंगोली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
तसेच औंढा पोलीस ठाण्यात २०१२ रोजी दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील संदीप उर्फ शेषराव काळे रा. रिसोड व बन्सी नारायण काळे हे दोघेजण मागील अनेक वर्षांपासून फरार होते. न्यायालयाने या दोघांनाही फरार घोषित केले होते. या दोघांनाही रिसोड जि. वाशिम येथील त्यांच्या राहत्या घरातून पथकाने अटक केली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि एस. एस. घेवारे, के. डी. पोटे, पोहेकाँ विलास सोनवणे, पोना संभाजी लेकुळे, राजुसिंग ठाकूर, भगवान आडे, वसंत चव्हाण, आकाश टापरे, प्रशांत वाघमारे आदींनी केली.