हिंगोली : येथील औंढा रोडवरील साई गार्डन बार ॲंड रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या नोकरानेच बार अँड रेस्टॉरंटमध्ये डल्ला मारीत काउंटरमधील ३ लाख ५७ हजार १३० रुपयांची रक्कम लांबविल्याची घटना ८ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोकराविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
हिंगोली शहरातील वंजारवाडा भागातील शिवाजी दत्तराव बांगर यांचे औंढा रोडवर साई गार्डन बार अँड रेस्टॉरंट आहे. त्याच्या दुकानात अविनाश लांडे (रा. गोवर्धन, ता. रिसोड) हा नोकर म्हणून कामाला होता. ७ जुलै रोजी शिवाजी बांगर यांनी दुकानाच्या काउंटरमध्ये ३ लाख ५७ हजार १३० रुपयांची रक्कम ठेवली होती. ८ जुलै रोजी सकाळी दहा वाजता बांगर हे दुकानामध्ये गेले असता त्यांना जेनरेट रूमवरील पत्रे वाकलेले तसेच किचन रूमचे शटर उचललेले दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी काउंटरची तपासणी केली असता काउंटरमध्ये ठेवलेली ३ लाख ५७ हजार १३० रुपयांचे रक्कम गायब झाल्याचे दिसले.
त्यांनी ही घटना हिंगोली ग्रामीण पोलिसांना कळविली. त्यावरून सपोनि बळीराम बंदखडके, पोह गजानन पोकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुकानातील नोकर अविनाश लांडे यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले. चोरी केल्यानंतर अविनाश लांडे फरार झाला. याप्रकरणी शिवाजी बांगर यांच्या फिर्यादीवरून नोकर अविनाश लांडे याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह गजानन पोकळे करीत आहेत.