हिंगोली : कुलूप बंद घरे फोडून सोने-चांदीचे दागिणे लंपास करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दापाश केला. यातील एकास ताब्यात घेतले असून तिघांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी १ लाख ३७ हजारांचा मुद्देमालही जप्त केला.
हिंगोली शहरात मे ते ऑगस्ट २०२३ या काळात घरफोडीच्या तीन घटना घडल्या होत्या. चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिणे असा ऐवज लंपास केला होता. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यावरून पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने यांचे पथक चोरट्यांच्या मागावर होते. पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत संशयित वस्त्यांवर छापेमारीही केली. खबरेही कामाला लावले. सायबर सेलच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू केला होता.
या वेळी हिंगोली शहरात झालेल्या घरफोडी प्रकरणात उमेश सर्जेराव चव्हाण (रा. धानोरा ता. कळमनुरी) याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसह तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पथकाने त्याचेकडून १ लाख ३७ हजार रूपयांचे सोने-चांदीचे दागिणे हस्तगत केले. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, दिपक पाटील, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले यांच्या पथकाने केली.
तीन साथीदारांचा शोध सुरूदरम्यान, पथकाने उमेश सर्जेराव चव्हाण यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या तीन साथीदारांचा शोध पथकाने सुरू केला. लवकरच हे तिघेही हाती लागतील अशी माहिती पोलिसांनी दिली.