अंबाजोगाई : गंगाखेड शुगर अॅन्ड एनर्जी लि. कारखान्यासोबत ऊसतोड मजुर पुरवठा व ऊस वाहतुकीचा करार करण्यासाठी दोघा मुकादमांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून तब्बल २५ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज उचलल्याच्या आरोपावरून गंगाखेडचे आ. रत्नाकर माणिकराव गुट्टे यांच्यासह कारखान्याचा कार्यकारी संचालक आणि बँक आॅफ इंडिया अंबाजोगाई शाखेच्या तत्कालीन व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१८ मध्ये कर्जखाते थकीत गेल्याने मुकादमांना नोटीसा गेल्या आणि प्रकार उघडकीस आला.
करारासाठी कारखान्याने दोन्ही मुकादमांचे कोरे धनादेश, कोरे बॉण्ड, ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या आरसी बुकच्या प्रती, विमा पॉलिसीच्या प्रती, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकाची प्रत, स्वाक्षरी पडताळणी अर्ज, शेताचा सातबारा आदी ठेऊन घेतले होते. बँकेत बनावट खाते उघडून त्यातून कर्जाची रक्कम उचलण्यात आली. गुट्टे हे दुसऱ्या एका प्रकरणात सध्या औरंगाबादच्या हर्सूल तुरुंगात आहेत.