हिंगोली : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांचे हिंगोलीत आगमन झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांचे तीनशे किलो फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. दोन जेसीबीने त्यांना हा हार घालण्यात आला.
जरांगे यांनी हिंगोली येथील विश्रामगृहावर काही वेळ थांबल्यानंतर डिग्रस फाटा परिसरातील सभेच्या ठिकाणाकडे प्रयाण केले आहे. त्यांच्यासमवेत हजारो मराठा युवक दुचाकी व चारचाकीच्या ताफ्यातून सभास्थळी रवाना झाले आहेत. हिंगोली शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी जरांगे यांच्या स्वागतासाठी हजारो नागरिक थांबल्याचे पहायला मिळाले. डिग्रस फाटा परिसरातील सभास्थळीही लाखोंचा जनसमुदाय उपस्थित झाला आहे. या ठिकाणी पोवाडे, मुलींची आरक्षणाची भाषणे झाली असून जरांगे पाटील यांची प्रतीक्षा या समुदायाला दिसून येत आहे.
सभेला मोठी गर्दीहिंगोलीनजीक डिग्रस फाटा परिसरात आयोजित केलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मोठी गर्दी झाली आहे. लाखावर जनसमुदाय सभेला उसळला आहे. जिल्ह्यातील विविध भागातून महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.
ठिकठिकाणी अन्नछत्र व पाणीजरांगे यांच्या सभेला लाखावर जनसमुदाय लोटणार असल्याचा आयोजकांना आधीच अंदाज होता. त्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी अन्नछत्र उभारले होते. या ठिकाणी शिस्तीत भोजन वाटप केले. तर ठिकठिकाणी पाणी वितरणाची व्यवस्थाही केली होती. शुद्ध पाण्याचे टँकर व पाण्याच्या बाटल्याही उपलब्ध करून दिल्याचे पहायला मिळाले.