सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील साखरा येथील दुकान बंद करून येलदरीकडे जाणाऱ्या सराफा व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या गोपाल देवराव पायघन (२६ रा.अंजनखेडा, जि. वाशीम), दिनकर पांडुरंग रणबावळे (३६), गोपाल श्रीराम लांडगे (२६ दोघे रा.माझोड, ता.सेनगाव) या तीन चोरट्यांना पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे १२ मार्च रोजी सायंकाळी मुद्देमालासह अटक करण्यात यश आले. नागरिकांनी चोरट्यांची यथेच्छ धुलाई करुन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास साखरा येथील सराफा व्यापारी गजानन डहाळे हे आपले दुकान बंद करून दुचाकीवरून येलदरीकडे जात असताना साखरा येथून पाठलाग करणाऱ्या दोन दुचाकीवर असलेल्या तीन चोरट्यांनी लिंबाळा पाटीनजीक त्यांना आडविले. त्यांच्या गळ्याला धारदार चाकू लावून एक लाख २३ हजार रुपयांची सोने-चांदीची दागिने ठेवलेली बॅग हिसकावून सेनगावच्या दिशेने पलायन केले. डहाळे यांनी या घटनेची माहिती सेनगाव येथील आपल्या भावाला व सेनगाव पोलिसांना दिली. यानंतर सेनगावचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्यासह पोलीस कर्मचारी जिया पठाण, माधव शिंदे यांनी विविध मार्गांवर पोलीस तैनात केले.
हे चोरटे वरुडचक्रपान येथे लक्ष्मण डिंगाबर गवळी, गजानन विठ्ठल चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना देत सेनगावपर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. सेनगाव -वरुड चक्रपान रस्त्यावर नदीनजीक दोन चोरट्यांना सेनगाव येथील प्रवीण महाजन, वैभव देशमुख यांच्यासह पाठलाग करणाऱ्या तरुणांनी मोठी हिंमत दाखवत सोने-चांदीच्या बॅगसह रंगेहाथ पकडले. चोरटे पकडल्यानंतर नागरिकांनी त्यांची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. चोरट्यांकडून विनाक्रमांकाच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या.
चोरट्यांकडे पोलीस मित्र ओळखपत्रलुटमारी करताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोन चोरट्यांकडे गोरेगाव पोलिसांनी दिलेले दोन पोलीसमित्र ओळखपत्र आढळून आले आहेत. नागरिकांना भीती दाखविण्यासाठी तर या ओळखपत्राचा चोरटे उपयोग करीत नसावेत, असा संशय व्यक्त होत आहे.