हिंगोली : वसमत शहरातील दोन घरफोड्यांच्या प्रकरणातील आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून त्यांच्याकडून तीन तोळे सोने व ६० तोळे चांदी जप्त करण्यात आली आहे.
वसमत शहरात २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जवाहर कॉलनीतील जिबोद्दिन सिद्दीकी यांच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी हात साफ केले होते. तर १० मे २०२४ रोजी मंगळवारा रोड भागातील राजाभाऊ सौंदनकर यांच्या घरी याचप्रकारे चोरी केली होती. या वाढत्या घटनांमुळे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना तपासासाठी आदेश दिले होते. त्यांनी सपोनि राजेश मलपिलू यांचे पथक स्थापन केले होते. त्यात हिंगोली व नांदेड जिल्ह्यात घरफोडी, चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोघांचा समावेश असल्याचे समोर आले.
यावरून वसमतमधील सतनामसिंग गुरूमुखसिंग चव्हाण व गणेशपूर भागातील रमेश सुरेश गायकवाड या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी या गुन्ह्यांची कबुली दिली. यात सिद्दीकी यांच्या घरी झालेल्या चोरीतील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गलसर, ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ७ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे रिंग, २ ग्रॅम वजनाचे गुलाबी मनी असलेले मंगळसूत्र, १० तोळे चांदीची चेन मिळाली. तर सौंदनकर यांच्या घरी झालेल्या चोरीतील २० तोळे चांदीचे २ चेनचे जोड, १५ तोळे चांदीचे पायातील १५ जोडवे, १५ तोळे वजनाचे चांदीचे कडे, बिनले व वाळे मिळाले. एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पथकात पोलिस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, तुषार ठाकरे, दत्ता नागरे यांचा समावेश होता.