शिरड शहापूर ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील आंबा चोंडी येथील मराठवाडा ग्रामीण बँक लुटण्याचा तीन चोरट्यांनी प्रयत्न केल्याची थरारक घटना आज सायंकाळी ४. ४५ वाजण्याच्या सुमारास घडली. बँक मॅनेजरने पैसे देण्यास नकार दिल्याने चोरट्यांनी गोळीबार करत पलायन केले. दरम्यान, वसमत तालुक्यातील बाेथी शिवारात पोलिसांनी चोरट्यांना अवघ्या तासाभरात ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
आंबा चोंडी येथील मुख्य रस्त्यावर मराठवाडा ग्रामीण बँक आहे. आज सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरील तिघांनी बँकेत प्रवेश केला. बँकेत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी मॅनेजर ईशान फिसके यांच्याकडे पैशाची मागणी केली. तर एकाने कॅशियर विशाल नगरारे, बँक कर्मचारी नितीन व सेवक प्रदीप सरोदे यांच्याकडे पैसे देण्याची मागणी केली.
पैसे मिळत नसल्याने चिडलेल्या चोरट्यांनी मॅनेजर ईशांन फिसके यांच्या कानशिलाजवळ रिव्हालव्हर लावली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने रागात चोरट्याने एक गोळी चालवली. गोळीबाराने मॅनेजरच्या कॅबीनच्या काचा फुटल्या. यात बँकेचे कर्मचारी नितीन किरकोळ जखमी झाले. यानंतर चोरट्यांनी तेथून पलायन केले.
दरम्यान, बँक बंद होण्याची वेळ असल्याने सुदैवाने बँकेत एकही ग्राहक नव्हता. यामुळे अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बँकेजवळ मोठी गर्दी केली. माहिती मिळताच कुरुंदा येथील सपोनि सुनील गोपीनवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनास्थळी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, वसमतचे डीवायएसपी कांबळे आदींनी भेट दिली. पोलिसांनी वाई व पांगरा शिंदे या रस्त्यांवर नाकाबंदी केली. यानंतर अवघ्या तासाभरात वसमत तालुक्यातील बाेथी शिवारात पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.