हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. लाभार्थ्यांना ई - पॉस मशीनवर अंगठा लावावा लागणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी पुढाकार घेत आहे. सामाजिक अंतर पाळावे, हात स्वच्छ धुवावेत, विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क वापरावा, असे आवाहनही वारंवार केले जात आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात प्रशासन व्यस्त असताना आता रेशन लाभार्थींना मोफत धान्य वितरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थींना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. मोफत धान्य वाटप करताना लाभार्थ्यांचा अंगठा ई-पॉस मशीनवर घ्यावा लागणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचीच भीती व्यक्त केली जात आहे. रेशन दुकानासमोरील गर्दी रोखण्यासह कोरोना टाळण्याची दुहेरी जबाबदारी रेशन दुकानदारांना पार पाडावी लागणार आहे.
जिल्ह्यातील रेशनकार्ड
१८८८७३
अन्न सुरक्षा
१३१८३८
अंत्योदय
२६३५९
शेतकरी
३०७७६
रेशन दुकानांवर सॅनिटायझर राहणार का?
-शासनाने घोषणा केल्याप्रमाणे पात्र लाभार्थींना मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. परंतु, लाभार्थींना ई-पॉस मशीनवर अंगठा लावावा लागणार असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- काही रेशनदुकानदार सॅनिटायझर ठेवतीलही. मात्र, सर्वच लाभार्थ्यांसाठी सॅनिटायझर ठेवणे परवडणार नसल्याची प्रतिक्रिया रेशन दुकानदारांमधून उमटत आहेे.
रेशन दुकानदारांच्या मागण्या काय ?
-कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता रेशन दुकानदारांनाही स्वत:ची काळजी वाटत आहे. त्यामुळे शासनाने रेशन दुकानदारांना विमा कवच द्यावे, अशी मागणी रेशन दुकानदारांमधून होत आहे.
-मोफत धान्य वाटप करताना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. तसेच धान्य वाटपामागे अनुदान देण्याची मागणी रेशन दुकानदारांतून होत आहे. शिवाय काही ई-पॉस मशीनमध्ये डाटा अपलोड नसल्याचा आरोप केला जात आहे.
त्यात रेशन धान्य वाटपाचे आव्हान रेशन दुकानदारांना पेलावे लागणार आहे.
लाभार्थींची गैरसोय कायम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला असला तरी अद्याप हे धान्य बहुतांश लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात हाताला काम नाही. त्यात धान्य नसल्याने गैरसोय मात्र होत असल्याचे दिसत आहे.
फोटो : १४