हिंगोली : जिल्ह्यातील कलगाव, लिंबी शिवारात वाघाने धुमाकूळ घालत चार गायी फस्त केल्याची घटना ताजी असतानाच सेनगाव तालुक्यात पाच शेतकऱ्यांवर शनिवारी (दि.२ ) दुपारी वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या भागात वाघाच्या पावलाचे ठसे आढळल्याचे सांगून उपविभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी यास दुजोरा दिला असून, शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे सुमारे बावीस वर्षांनंतर प्रथमच मराठवाड्यात वाघाचे अस्तित्व जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात वाघाचे आगमन होण्याची ही प्रथमच घटना असल्याची माहिती उपविभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी दिली. या वाघाने बुधवारी लिंबी येथील श्रीराम मारुती बेले यांची गाय मारली. खातरजमा करण्यासाठी त्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तेथे वाघाचे पंजे आढळून आल्याने तो बिबट्या नसून वाघच असल्याचे स्पष्ट झाल्याचे वाबळे यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी वन विभागाची यंत्रणा वाघाचा शोध घेत असताना कलगाव येथील शेतकरी बाबूराव शकूराव पौळ यांच्या तीन गायी शेतात वाघाने मारून खाल्ल्याचे दिसून आले.
सेनगावात शेतकऱ्यांवर हल्लाजिल्ह्यातील कलगाव, लिंबी शिवारात वाघाने धुमाकूळ घातला असून त्याने आत्तापर्यंत चार गई फस्त केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली. सदर वाघाचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत असताना या घटनास्थळापासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सेनगाव तालुक्यातील सूकळी खु शिवारात शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना वाघ निदर्शनास आला. या वेळी डरकाळी फोडत वाघ आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच भगवान शिरसाट,केशव खिलारी ,रमेश आठवले हे शेतकरी सोयाबीन सुडीचा गंजीवर चढले. परंतु, या वेळी काही अंतरावर असलेल्या सुनील श्रीराम कबाडे (२६) या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सुनीलसह इतर शेतकऱ्यांनी आराडाओरड सुरु केला. मात्र तोपर्यंत सुनीलयास गंभीर जखमी करून वाघ पसार झाला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी शेतकरी ,ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
घटनास्थळी वनविभागाचे उपविभागीय अधिकारी केशव वाबळे ,सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी पवार,वनपरिक्षेत्र अधिकारी जि.पी.ढगे,वनपाल एम.व्ही.जावडे,वनरक्षक एम.जी.कुऱ्हा यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. परिसरात आढळले ढसे हे वाघाचेच असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी ढगे यांनी सांगितले. सदर वाघ हिगोली तालुक्यातील कलगाव,लिंबी, खंडाळा शिवारात धुमाकूळ घालून या परिसरात आला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर...या संदर्भात औरंगाबादचे निवृत्त वन अधिकारी रवींद्र धोंगडे यांनी सांगितले की, १९७२ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात गौताळा येथील औट्रम घाटात चाळीसगावचे प्रसिद्ध शिकारी डॉ. पूर्णपात्रे यांनी वाघ मारला होता. (त्याकाळी शिकारीला बंदी नव्हती.) त्यानंतर नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवरील पैनगंगेजवळ किनवट तालुक्यात खरबी जंगलात १९९७ च्या जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात व्याघ्रराजाचे दर्शन झाले होते. त्यानंतर आताच मराठवाड्यात वाघ आल्याची चिन्हे आहेत.
रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी शेतात मुक्काम करण्याचे टाळावे, तसेच परिसरात एकट्याने फिरताना काळजी घ्यावी.- केशव वाबळे, उपविभागीय वन अधिकारी