हिंगोली: जिल्ह्यातील कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असले, तरी मालवाहू रिक्षाचाकांची मात्र उपासमार होताना दिसून येत आहे. कोरोनाच्या आधी या रिक्षा चालकांना दिवसाकाठी अडीचशे त तीनशे रुपये मिळायचे, परंतु सद्य:स्थितीत मात्र शंभर रुपयेही पदरात पडेना झाले आहेत.
शहरातील गांधी चौक भागात जवळपास ३० मालवाहू रिक्षा चालक कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मोलमजुरीचे काम करतात. कोरोनाच्या आधी या रिक्षा चालकांच्या हाती ३०० ते ४०० मजुरी पडायची, परंतु कोरोना आजारामुळे गत सात-आठ महिन्यांपासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा चालविण्याबरोबर इतर अंगमेहनतीची कामेही हे रिक्षा चालक करतात. मार्च ते ऑक्टोबर हे आठ महिने त्यांना घरीच बसावे लागले. नोव्हेंबर महिन्यापासून मालवाहू रिक्षा चालविण्यास परवानगी मिळाली असली, तरी हाताला काम मिळत नाही. लेकराबाळांना कसे पोसावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
सध्याच्या स्थितीत कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असले, तरी हाताला काम मिळत नाही. शहरात जवळपास २५ ते ३० मालवाहू रिक्षा आहेत. सकाळी आठ वाजता घरून निघाल्यानंतर गांधी चौक येथे हाताला काम मिळते का, या आशेवर दिवसभर बसून असतो. सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत दिसेल ते काम करतो, परंतु सध्या कोरोना आजारामुळे पदरात मात्र शंभर रुपयांच्या वर काहीच पडत नाही. त्यामुळे घर संसार कसा चालवावा, लेकराबाळांना काय खाऊ घालावे, असा मोठा प्रश्न मालवाहू रिक्षाचालकांना पडला आहे.
शासनाने आर्थिक मदत करावी
मागील आठ महिन्यांपासून मालवाह रिक्षा चालकांना कामे नसल्यामुळे उपासमार होत आहे. शासनाने मालवाहू रिक्षा चालकांवर होत असलेली उपासमार लक्षात घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी राजू हतागळे, शेख उस्मान, ज्ञानेश्वर शिवरे, आकाश पाटोळे, मोतीराम गायकवाड, शेख रबानी, रवी पाटोळे, संदीप पाटोळे, खंडू पाटोळे, रामा हतागळे आदींनी केली आहे.