आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : नांदेड-हिंगोली महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ रायपूर (छत्तीसगड) येथून सोलापूरकडे कामासाठी जाणाऱ्या कामगारांची खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे पाच वाजता हा अपघात झाला आहे. जखमींना नांदेड येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले असून पाच कामगाराची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,रायपूर (छत्तीसगड) येथून सुमारे ६० कामगार कामासाठी सोलापूर येथे खाजगी बसने (क्र.सीजी -०८-एएल- ६०२५) जात होते. आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर जामगव्हाण पाटीजवळ पहाटे पाच वाजता एका वाहनाला ओव्हरटेक करताना वळण रस्ता लक्षात न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. पहाटे साखर झोपेत असलेल्या कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला.
या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार शेख बाबर, भगवान वडकिले, चालक भारत मुलगीर, गजानन मुटकुळे ,डाखोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने दोन रुग्ण वाहिका बोलावून बसमधील जखमींना बाहेर काढून १५ जणांना दोन्ही रुग्णवाहिकेतून प्रथम डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार दिले. यातील पाच जण गंभीर असल्याने त्यांना नांदेडला उपचारासाठी पाठविले. उर्वरीत कामगार किरकोळ जखमी आहेत. या अपघातातील जखमींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पोलिसांनी तातडीने धावपळ करून जखमींना उपचारासाठी पाठविल्यामुळे त्यांची नांवे समजू शकली नाही.