हिंगोली : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे महावितरणची १४ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत नगर परिषदेची थेट वीज तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली.
मागील अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या वीजबिलापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित केला जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे १४ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये औंढा नागनाथ उपविभागातील ग्राहकांकडे २६ लाख, वसमतमध्ये ३ कोटी ६५ लाख, कळमनुरी ५ कोटी ५५ लाख, सेनगावमध्ये ४ कोटी १५ लाख तसेच हिंगोली ग्रामीण उपविभागाकडील ग्राहकांकडे ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबर पथदिवे वीजग्राहकांकडे ७१ कोटी ८ लाख रुपये थकबाकी आहे. नांदेड जिल्ह्यातील पाणीपुरवठा वीजग्राहकांकडे डिसेंबर २०१७ अखेर १०६ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर परभणी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे २१ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे.
परिमंडळातील नांदेड, हिंगोली आणि परभणी तीन जिल्ह्यातील मिळुन ४७७. ७२ कोटींची थकबाकी वसुलीचे आव्हान महावितरण पुढे आहे. वीजबिल वसुलीसाठी पथक नेमले आहे.थकबाकीचा डोंगर :महावितरणसाठी डोकेदुखीपाणीपुरवठा आणि पथदिवे वीजग्राहकांकडील थकबाकी महावितरणसाठी डोकेदुखीचा विषय ठरत असून थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढतच आहे. परिणामी, नाईलाजास्तव महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.नांदेड परिमंडळातील पाणीपुरवठा ग्राहकांकडे १४२ कोटी ४३ लाख तर, पथदिवे ग्राहकांकडे ३३५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती देण्यात आली. ज्यांनी बिलभरणा केला नाही त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.हिंगोली नगरपालिकेने ८ फेबु्रवारी रोजी १६ लाख रूपये भरले. मात्र उर्वरीत रक्कम भराणा बाकी आहे. त्यामुळे नगर परिषदेचा कधीही वीज तोडली जाईल, असे महावितरणने सांगितले.