हिंगोली: कोरोना काळात लग्न, अंत्यविधी, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने ई-पास बंधनकारक केले आहे. मात्र ई-पास घेताना काही नागरिक अफलातूर कारणे देत आहेत. घरात बसून कंटाळा आलाय, बाहेर जाण्यासाठी ई-पास हवाय , मुलीला बघण्यासाठी जायचे आहे आदी कारणे ई-पास घेताना दिली जात आहेत.
जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. अशीच स्थिती राज्यभरातील होती. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले होते. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले होते. एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी तर दुसरीकडे अंत्यसंस्कार, दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने ई-पास देण्यास सुरुवात केली. दवाखाना, अंत्यविधी यासह अत्यवश्यक सेवेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ऑनलाईन अर्ज करुन ई-पास मिळविला जात होता. आताही ई-पास दिला जात आहे. मात्र ई-पास घेताना काही नागरिक केवळ गंमत म्हणून ऑनलाईन अर्ज करीत आहेत.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही
कोरोना काळात केवळ अंत्यविधी, उपचारास जाण्यासाठी पास दिला जातो. मात्र केवळ घराबाहेर जायचे म्हणून काही जणांनी विविध कारणे देवून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचे कसब पूर्ण केले. केवळ दवाखान्यातील कागदपत्रे दाखवून दुसऱ्या जिल्ह्यात अनेकजण गेले आहेत. काही जणांनी केवळ आधारकार्ड अपलोड करुन ई-पासची मागणी केली. मला घरात बसून कंटाळा आलाय, लग्नासाठी मुलगी पाहण्यास जायचे आहे. आताच लग्न झाले आहे, फिरायला जायचे आहे. मित्राला भेटायला जायचे आहे आदी कारणे अर्जात नमूद करत आहेत. काही महाभागांनी तर कोरे पेज अपलोड करण्याची गंमत केली आहे.
सर्वाचीच मेडिकल इमर्जन्सी कशी?
जिल्ह्यात मागील एक ते दीड महिन्यांत तब्बल ७ हजार १९१ जणांनी ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी २ हजार ७५२ जणांनी दवाखान्यात, अंत्यविधीला जाण्याचे कारण सांगितले आहे. काही जणांनी तर तीन ते चार वर्षापूर्वीचे तपासणीचे कागदपत्रे दाखवून आता मला तपासणीसाठी जायचे आहे, असे सांगून ई-पास मिळविण्याचा प्रयत्न केला. सर्वानाच मेडिकल इमर्जन्सी कशी काय असू शकते, अशी शंकाही काहीजण उपस्थित करीत आहेत.
काही वेळातच मिळतोय ई-पासयेथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-पास देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ई-पास देण्यासाठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे.ऑनलाईन अर्ज केल्यानंतर या विभागातून अर्जाची तपासणी करुन अर्ज तत्काळ निकाली काढला जात आहे.
ई-पाससाठी अर्ज ७१९१
मंजूर अर्ज २७५२
नामंजूर अर्ज ४४२८