हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर मंगळवारी प्रमाणपत्र काढण्यासाठी निराधार तसेच ज्येष्ठ नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. कोरोना महामारीची तिसरी लाट समोर असतानाही कोणालाही सामाजिक अंतराचे भान नसल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हा रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर दर मंगळवारी व शुक्रवारी निराधार, ज्येष्ठ, विधवा व इतर गरजूंना प्रमाणपत्र दिले जाते. कोरोनाकाळात महामारीचा प्रादुर्भाव होईल म्हणून प्रमाणपत्र देणे बंदच केले होते. सद्य:स्थितीत कोरोना महामारी कमी झाल्याचे पाहून शासनाने सर्वत्र अनलॉक केले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देणे सुरू केले आहे. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा, असे जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी २४ ऑगस्ट रोजी मात्र प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना मास्कबाबत व सामाजिक अंतराबाबत कोणीही सूचना दिलेली पाहायला मिळाली नाही. प्रमाणपत्र घेण्यासाठी रांगेत जेवढे होते तेवढेच खाली बसलेले नागरिक पाहायला मिळाले. वयाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन अशी वेळ देण्यात आलेली आहे. परंतु, कोरोनाकाळात प्रमाणपत्र देणे बंद होते. त्यामुळे पाच वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे.
...अन् निराधार बोलते झाले
वयाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून आलो. सुरुवातीला एकच गार्ड या ठिकाणी होता. नंतर गर्दी वाढल्याचे पाहून दुसरा गार्ड आला. दोघांनाही गर्दी आवरेना झाली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. परंतु, पाणी कुठेही ठेवले नाही.
- चांद खाँ, नागरिक
वयाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार असे दोनच दिवस ठेवले आहेत. यासाठी तीन दिवस ठेवायला पाहिजे. दोन वाजले की, प्रमाणपत्र देणे बंद केले जाते. मग काय आल्यापावली परत जावे लागते.
- संदीप सावळे, नागरिक
प्रतिक्रिया
वयाचे प्रमाणपत्र कोरोनाकाळात बंद होते. ऑगस्ट महिन्यापासून वयाचे प्रमाणपत्र मंगळवार आणि शुक्रवारी देणे सुरू केले आहे. तिसरी लाट लक्षात घेऊन डॉक्टरांकरवी रांगेतील लोकांना मास्क व सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना दिली आहे. गर्दीला आवरण्यासाठी दोन गार्डही तैनात करण्यात आले होते. गर्दी न करता शिस्तीने वयाचे प्रमाणपत्र काढून घ्यावे, अशीही सूचना दिलेली आहे.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक
फोटो ६