- महेबूब पठाण
शिरडशहापूर (जि. हिंगोली) : वाई गोरक्षनाथ येथे पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी बैलपोळा साजरा करण्याची अनेक शेकडो वर्षांपासून प्रथा असून, त्या प्रथेप्रमाणे वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळ्याला हिंगोली जिल्ह्यासह शेजारच्या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या ‘सर्जा-राजाची’ जोडी आणून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. श्री गोरक्षनाथाच्या दर्शनासाठी ऐतिहासिक बैलपोळ्याला जवळपास ८ ते १० हजार बैलजोड्या आल्या होत्या.
२ सप्टेंबर रोजी बैलपोळा साजरा केल्यानंतर करीच्या दुसऱ्या दिवशी बैलपोळा भरविण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यावर्षी पोळ्याच्या तोंडावरच पावसाचे आगमन झाल्यामुळे पोळा सण साजरा होतो की नाही, असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु करीच्या दुसऱ्या दिवशी पावसाने उघाड दिल्यामुळे वाई गोरक्षनाथ येथे पारंपरीक बैलपोळा साजरा करता आला. प्रारंभी उपस्थित शेतकऱ्यांनी श्री गोरक्षनाथ मंदिरात विधिवतपणे पूजा करुन नंतर बैल पोळ्याला सुरुवात केली. यानंतर बैलांची पूजा करुन श्री गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्व शेतकरी तयार झाले आणि वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढत बैलपोळा सण साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या येथे दर्शनासाठी आणल्या होत्या. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
३ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता संस्थांनच्या वतीने श्री गोरक्षनाथ यांना महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तसेच वाई गोरखनाथ ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या शेतकऱ्यांसाठी महाप्रसाद, चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बैलपोळा लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुधनासाठी शिबीर घेण्यात आले. तसेच दर्शनासाठी आणलेल्या सर्व बैलांचे लसीकरण करण्यात आले. बैलपोळ्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन कुरुंदा पोलिस ठाण्याच्या वतीने वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वाई येथे बैल आणल्यांतर आजार होत नसल्याची धारणावाई येथे बैलजोडी आणून श्री गोरक्षनाथाचे दर्शन घेण्याची परंपरा शेकडो वर्षांची वर्षापासूनची आहे. श्री गोरक्षनाथाच्या मंदिराला प्रदक्षणा घातली की, बैलांना कोणताही आजार होत नाही, बैल शेतीकामासाठी तंदुरुस्त राहतात, अशी धारणा आहे. त्यामुळे तर दरवर्षी तिन्ही जिल्ह्यांतील शेतकरी आपल्या बैल, गाय व वासरांना येथे घेऊन येतात. ही परंपरा अनेक वर्षापासून वाई गोरक्षनाथ येथे सुरु आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारोतराव कदम महाराज, संभाजी निर्मळ, दुलबाराव कदम, शामराव कदम, बाबूराव कदम, रावसाहेब कदम, माणीकराव कदम व पंचक्रोशीतील नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, फौजदार रहीम चोधरी, फोजदार कारामुगे, जमादार बालाजी जोगदंड, शंकर भिसे, विकास राठोड आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.