नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी
शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर वॉर्ड क्र. १ बरकतपुरा येथील नाल्या कचऱ्यांनी भरून गेल्या आहेत. त्यामुळे नाल्यांतील पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी ये-जा करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. ग्रामपंचायतने वेळीच याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडाबाळापूर व परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरींना भरपूर प्रमाणात असतानाही वीज गायब होत असल्याने पाणी पिकांना देता येत नाही. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन आखाडा बाळापूर व परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालक त्रस्त
सवना: सेनगाव तालुक्यातील सवना ते ब्राह्मणवाडा या चार किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे वाहनचालक कमालीचे वैतागले आहेत. वरिष्ठांनी याची दखल घेऊन सवना ते ब्राह्मणवाडा हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
भुईमूग पिकावर रानडुकरांचा ताव
सवना : सेनगाव तालुक्यातील चोंडी, सवनावाडी, सुरजखेडा आदी शेतशिवारात शेतकऱ्यांनी भुईमुगाचा मोठ्या प्रमाणात पेरा केला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रानडुकरे व इतर वन्य प्राणी शेतात येऊन भुईमूग व इतर पिकांची नासाडी करीत आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वन विभागाकडे अनेक वेळा केली आहे. परंतु, अद्याप तरी वन विभागाने लक्ष दिले नाही. रानडुकरासह इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नळाचे पाणी वेळेवर सोडण्याची मागणी
कळमनुरी: शहरातील गणेशनगर, सहयोगनगर, ब्राह्मणगल्ली, पाटील गल्ली, शास्त्रीनगर, विकासनगर, आठवडी बाजार, इंदिरानगर आदी नगरामध्ये नळाचे पाणी वेळेवर सोडण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्याची वाट पहात बसावी लागते. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगण्यात आले. परंतु, कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही. नगर परिषदेच्या वरिष्ठांनी लक्ष देउन नळाला पाणी वेळवर सोडण्याची सूचना द्यावी, अशी मागणी नागिरकांनी केली आहे.
बसस्थानकात कचऱ्याची ढिगारे
कळमनुरी: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. ढिगावरील कुजलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आगारप्रमुखांनी प्रवाशांनी मागणी लक्षात घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी व प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.