हिंगोली : विविध गुन्ह्यातील आरोपींना गुन्हेमाफीसाठी बैठक आयोजित केल्याचे सांगून १२ आॅक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बोलावले. त्यानंतर संवाद साधताना मात्र काहीजण विचित्र बोलत असल्याने सगळ्यांचीच दोन तास धुलाई केली. नव्या एसपींचा हा दणका गुन्हेगारांना घाम फोडणारा ठरला आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक पदाचा नुकताच पदभार घेतलेले राकेश कलासागर यांनी १२ आॅक्टोबर रोजी विविध गुन्ह्यातील आरोपींची बैठक बोलाविली होती. जामिनावर बाहेर असलेले आरोपी, ज्यामध्ये दरोडेखोर, चोरटे व अट्टल गुन्हेगारांना हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी पथकातील पोउपनि शिवसांब घेवारे, किशोर पोटे, बालाजी बोके, सोनुने यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध गुन्ह्यातील आरोपी व दरोडेखोरांशी संवाद साधला आणि सोमवारी होणाऱ्या बैठकीस जवळपास ५० आरोपींना बोलावून घेतले. नवीन पोलीस अधीक्षक तुमच्याशी संवाद साधणार आहेत, तसेच गुन्हे माफ करणार आहेत, व तुम्हाला काही आवश्यक सूचनाही देणार आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी बैठकीस उपस्थित राहणे गरजेचे आहे, असे आरोपींना सांगण्यात आले. काही आरोपींना वाहनाने आणले तर अनेकजण स्वत:हून बैठकीस हजर झाले. मात्र आधी आढावा घेतल्यानंतर त्यांना पुढे वेगळ्याच परिस्थितीचा सामना करावा लागला.
रुद्रावतार पाहून फुटला घामसोमवारी दुपारी ४ वाजता आरोपींची बैठक सुरू झाली. यावेळी आरोपींसोबत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी संवाद साधला. परंतु यावेळी काही गुन्हेगारांचा रूबाब पाहून एसपींनी सगळ्यांचीच धुलाई केली. दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या आरोपींचा चांगलाच समाचार घेतल्याने गुन्हेगारी क्षेत्रातील इतर आरोपींचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षकांचा रुद्रावतार पाहून अनेकांना घाम फुटला.