विभागीय आयुक्तांनी ऑनलाईन बैठकीद्वारे विविध मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी प्रशिक्षण घेतले.. यात शहरी व ग्रामीण भागातील आशा, स्वयंसेविका उपस्थित होत्या. १ ऑगस्टपासून प्रत्यक्ष गृहभेटी व ज्येष्ठ नागरिक सर्वेक्षण करण्यासाठी यात प्रशिक्षण देण्यात आले. यात ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबातील सदस्य व त्यांचे व्यवसाय, सोबत राहणाऱ्या व्यक्तींची माहिती, ज्येष्ठ नागरिकांची उत्पादन साधने उदा. शेती जोडधंदा, पेन्शन, मुलांकडून मिळणारी मदत मिळते की नाही, मालकीचे घर आहे किंवा कसे, घराचे स्वरूप कसे, बँकेत खाते आहे किंवा नाही याची माहिती घ्यायची आहे. ही माहिती घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य व बिनचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. कोरडे यांनी केले.
आजाराबाबतही सर्व्हे
या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, संधिवात, मोतीबिंदू, विसरभोळेपणा, बहिरेपणा, अस्थमा आदी आजार आहेत का? याचीही माहिती गोळा केली जाणार आहे. त्याचबरोबर आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदान कार्ड त्यांच्याकडे आहे का? त्यांना घरकुल, शौचालय बांधकाम, विविध निराधार योजनांचा लाभ मिळतो का? मिळत नसल्यास त्यांना यापैकी काहीची आवश्यकता आहे का? याचीही माहिती घेतली जाणार आहे.