हिंगोली : शहरात मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंबंधी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच वाहतूक शाखेचे सपोनि ओमकांत चिंचोलकर यांनी एका व्हिडीओद्वारे मोकाट गुरांच्या मालकांना गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे. विशेष म्हणजे हा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून राज्यभरात त्याचे कौतुक होत आहे.हिंगोली शहरात जवळपास पाचशेवर मोकाट जनावरे आहेत. गतवर्षी पालिकेने या जनावरांना कोंडवाड्यात कोंडले होते. तेव्हा सदरील पशुपालकांनी जनावरांना सोडविण्यासाठी पालिकेकडे धाव घेतली होती. परंतु दंड आकारुन या जनावरांना सोडून देण्यात आले. यातील निम्मी जनावरे मोकाट असल्याने त्यांना सोडविण्यासाठी कुणीही आले नाही. त्यामुळे पालिकेने या जनावरांचा काही दिवस सांभाळ करुन त्यांना पुन्हा शहरात सोडून दिले होते. या पशुपालकांवर कडक कारवाई न केल्याने त्यांनी पुन्हा ती जनावरे शहरात सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांनी चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह भाजी विक्रेते, व्यापारी व नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ही तर न.प.ची जबाबदारीसदरील पशुपालकांनी आपापली जनावरे ताब्यात न घेतल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशाराही या व्हिडीओद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील पशुपालकांचे धाबे दणाणले आहेत. या जनावरांच्या मालकांची माहिती नसल्यामुळे या व्हिडीओद्वारेच नोटीस देत असल्याचे चिंचोलकर यांनी म्हटले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र पालिकेने या बाबतीत हात झटकले आहेत. या जनावरांच्या मालकांची यादी पोलिसांना देण्यास पालिका विलंब करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
शहरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे. ही जनावरे अचानक वाहनासमोर आल्याने अपघात होतात. वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे. पोलीस मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हा दाखल करु शकतात, हे अनेकांना माहित नाही. या व्हीडीओद्वारे जनावरांच्या मालकांना माहिती दिली आहे. जनावरांच्या मालकांना एका आठवड्याचा वेळ दिला आहे. तरीही जनावरे रस्त्यावर दिसून आल्यास संबंधितांविरूद्ध थेट गुन्हे दाखल केले जातील. - ओमकांत चिंचोलकर, सपोनि वाहतूक शाखा, हिंगोली