हिंगोली : कोरोना महामारीचे वाढते रुग्ण पाहता शासनाने एस. टी. प्रवासात ओळखपत्र दाखविणे बंधनकारक केले आहे. शुक्रवारी हिंगोली स्थानकातून परजिल्ह्यांत जाणाऱ्या बसेसमधील २२ प्रवाशांचे ओळखपत्र तपासून त्यांना प्रवासास परवानगी दिल्याची माहिती स्थानकप्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली.
कोरोना महामारीचा धोका ओळखून हिंगोली आगारातून शुक्रवारी एकही बस सोडण्यात आली नाही. बसस्थानकातून परजिल्ह्यांत जाणाऱ्या दोन बसेस होत्या. त्यामध्ये नांदेड व पुसद येथील बसेसचा समावेश आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही काहीजण काम नसतानाही विनाकारण प्रवास करताना आढळून येत आहेत. हे पाहून शासनाने शक्कल लढवत प्रवासादरम्यान प्रवाशांना ओळखपत्र दाखविणे बंधनकारक केले आहे. एवढेच नाही तर प्रवाशांच्या उजव्या किंवा डाव्या हातावर क्वारंटाईन शिक्काही मारला जाणार आहे तसेच प्रवाशांची अँटिजेन तपासणीही केली करावी, असे महामंडळास परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
काही प्रवासी बसस्थानकावरील ॲंटीजेन तपासणीच्या भीतीपोटी जवळच्या थांब्यावर उतरत आहेत. त्यामुळे आता शहराच्या ठिकाणी दोनच थांबे राहणार आहेत. चालक, वाहकाने प्रवाशाच्या विनंतीवरून बस थांबविल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असेही पत्रकात नमूद केले आहे.
शाईसाठी पाठविले पत्र...
प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईन शिक्का मारायचा आहे; परंतु पहिल्याच दिवशी शिक्यासाठी शाई उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या हातावर शिक्का मारता आला नाही. याबाबत महामंडळाने शाई उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. शाई उपलब्ध झाल्यास लगेच अंमलबजावणी केली जाईल, असे महामंडळाने सांगितले.