वसमत : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात तरुणाईचाच बोलबाला पहावयास मिळाला. नव्या दमाचे नवेच नेतृत्व ग्रामीण भागात उदयास आल्याचे चित्र समोर आले आहे. आमदार राजू पाटील नवघरे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे वसमत तालुक्यावर राष्ट्रवादी व नवघरे समर्थकांचा दबदबा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.
वसमत विधानसभा मदारसंघाच्या निवडणुकीत आमदार राजू पाटील नवघरे यांना निवडून आणण्यात ‘आग्या मोहोळ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी उदयास आली होती. कोणत्याही पक्षाच्या व नेत्याच्या दावणीला नसलेले हे तरुण नवघरे यांच्या प्रचारात जिद्दीने उतरले होते. प्रतिकूल परिस्थितीत या आग्या मोहोळाने निकाल फिरवला होता. त्यानंतर लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही याच आग्या मोहोळाला पुढे करण्याची व्यूहरचना आमदार नवघरे यांनी आखली, विरोधी पक्ष नेते गाफील राहीले. विधानसभा लढविण्याचे मनसुबे बाळगणारे ग्रामपंचायत प्रचारात दिसले नाहीत. परिणामी एकट्या राजू पाटील नवघरे यांनी नव्या दमाच्या तरुणाईच्या मागे शक्ती उभी करून बाजी मारल्याचे चित्र आज समोर आले आहे.
आजवर ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात प्रस्थापितांची चलती रहायची. यावेळी तरुणाई भारी ठरल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्या. सोबत नवघरे समर्थकांचीही संख्या मोठी आहे. या दोघांची बेरीज केली असता ७० ते ७५ टक्के एकट्या आमदारांच्या बाजूच्या ग्रामपंचायती आल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतून अंग काढून घेतल्यासारखी अवस्था होती. विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना फारसे पाठबळ मिळाले नाही. त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत पहावयास मिळाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांचे गाव असलेल्या किन्होळा गावातही भाजपच्या पॅनेलला अपयश पहावे लागले. शिवसेनेला काही प्रमाणात आपले गड राखण्यात यश मिळविले. मात्र शिवसेनेच्या नेत्यांचा सक्रिय सहभाग फारसा प्रचारात दिसला नाही. कार्यकर्त्यांनी आपापल्या ताकतीने गड जिंकले. महाआघाडीच्या नावाने किती ग्रामपंचायती लढल्या व किती विजयी झाल्या व यात तीन पक्षांचे किती योगदान आहे हे यथावकाश समोर येईलच. परंतु, प्राथमिकदृष्ट्या नव्या दमाचे तरुण व राकाँचे वर्चस्व दिसत आहे.
कुरुंदा या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये सभापती राजू पाटील इंगोले यांनी एकहाती सत्ता मिळविली. एका जागेसाठी निवडणूक झाली होती. ती जागाही इंगोले यांच्या पॅनेलचीच आली. राजेश पाटील इंगोले यांच्या कामगिरीने त्यांच्या नेतृत्व गुणावर शिक्कामोर्तब झाले आहे.
निकालासंदर्भात आमदार राजू पाटील नवघरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वसमत मतदार संघातील ७५ टक्के ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या दमाचे पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने हे यश मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.