लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : आदिवासी आश्रमशाळेत विविध सेवा सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी डॉ. श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा लोहगाव येथील ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी दिवसभर आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या शाळेत ८ वी ते १२ वी च्या वर्गात २५१ विद्यार्थी संख्या आहे. त्यात १९३ मुले व ५८ मुलींचा समावेश आहे. ८ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता प्रकल्प कार्यालयासमोर सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी धरणे धरले. विद्यार्थ्यांच्या वतीने शाळा व प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. मागण्यासाठी विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होेते. यावेळी भारतीय आदिवासी पँथर संघटनेचे प्रशांत बोडखे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आरोप केला की, शाळेत शैक्षणिक व आर्थिक सुविधा नाहीत, १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाºया २८ विद्यार्थ्यांना आतापर्यंत गणवेश व पुस्तके नाहीत, मुलींसाठी निवासी वस्तीगृहाची सोय नाही, शाळेत बाथरूम नाही, एक वेळेसच तेल व साबण दिले, ८ वी व ९ वीच्या ९० विद्यार्थ्यांना वसतिगृहच नाही, विद्यार्थी गॅलरीत झोपतात, पुरेशी विजेची व्यवस्था नाही, आंघोळ व शौचालयासाठी बकेटही नाही, जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जाते, शाळेतील काही शौचालये बंदच आहेत, पाण्याची टाकी साफ केलेली नाही आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन कोले. आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ.विशाल राठोड म्हणाले, शाळेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येईल व दोषींवर कडक कार्यवाही केली जाईल. या आश्वासनानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेले होते. आंदोलनकर्त्यांनी प्रकल्प अधिकाºयांसोबत शाळेच्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी राजकुमार चिभडे, पांडुरंग कोकाटे, सचिन कºहाळे, शीतल चिभडे, राधा हजारी, सविता बंदके, भगवान बोंबले, कुंडलिक हनवते, ज्ञानेश्वर रिठ्ठे, अर्चना सोनुळे, नंदा कºहाळे, बालाजी गुहाडे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना लवकरच आवश्यक सोई-सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन संस्थेच्या पदाधिकाºयांनी दिले. परंतु सुविधा न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असे बोडखे यांनी सांगितले.डॉ. श्रीराम पवार आदिवासी आश्रमशाळा लोहगाव येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपाची मुद्देनिहाय चौकशी समितीमार्फत करण्यात येईल. शाळा दोषी आढळल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल, प्रत्येक विद्यार्थ्यांमागे महिन्याकाठी शाळेला ९२० रुपये मिळतात. सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.बी.राचलवार, पी.जी. पोटे यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर शाळेविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सांगितले.
आदिवासी विद्यार्थ्यांचे दिवसभर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:40 PM