आखाडा बाळापूर( हिंगोली) : ‘ऊसतोड कामगाराची मुलगी होणार डॉक्टर’ या आशयाची, तिच्या जिद्दीची कहाणी सांगणारी बातमी लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर भुरक्याची वाडी येथील आशाताई भुरके ही विद्यार्थिनी सर्वत्र प्रकाशात आली. त्यानंतर तिच्यासह अन्य एका विद्यार्थ्याला आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. जालना जिल्ह्यातील परतूर येथील आधारवड फाऊंडेशनने येथील दोन्ही ऊसतोड कामगारांचे पालकत्त्व स्वीकारले आहे. पहिल्या वर्षाच्या शैक्षणिक शुल्काचा धनादेश रविवारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वितरित केला.
भुरक्याचीवाडी येथील दोन ऊसतोड कामगारांची मुले एमबीबीएस प्रवेशास पात्र ठरले. याबाबतचे वृत्त २८ जुलै रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर डॉक्टर्स असोसिएशन व इतर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी अशा अनेकांकडून मदत सुरू झाली. जालना जिल्ह्यातील परतूर येथे आधार फाउंडेशनने आशाताई बाबूराव भुरके व कार्तिक शिरडे या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. वैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च संस्था करणार आहे. संस्थेच्या पदाधिका-यांनी ४ आॅगस्ट रोजी गावात जाऊन दोन्ही कुटुंबीयांना पहिल्या वर्षीच्या शैक्षणिक शुल्काचे धनादेश दिले. यावेळी फाउंडेशनचे कार्यकारी सचिव देविदास कराळे, सदस्य नागोराव खंदारे, सुनील चांदन, सचिन चव्हाण, अक्षय राऊत, सखाराम मुजमुले, डॉ. शरदचंद्र पारटकर, सरपंच संतोष भुरके, जगदेव भुरके आदी उपस्थित होते.
‘लोकमत’चे आभार मानले‘लोकमत’ने या आदिवासी विद्यार्थ्यांच्या कष्टाची कहाणी प्रकाशित करून समाजापुढे मांडली. ‘लोकमत’ने उपेक्षित घटकांचे दु:ख प्रकाशित करून लाखो उपेक्षितांपुढे लढण्याची प्रेरणा देणारी साहस कथा प्रकाशित केल्याबद्दल कार्यकारी सचिव देवीदास कराळे यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.