कुरुंदा ( हिंगोली ) : घरात बसावे तर भूकंपाचा धोका, बाहेर निघावे तर कोरोनाचा धोका अन् शेतात जावे तर गारपीटीचा धोका, अशा विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे वसमत तालुक्यातील कुरुंदा व परिसरात पहायला मिळाले. समाजमाध्यमांवर उपहासाने फिरणाऱ्या संदेशाची प्रत्यक्ष प्रचितीच ग्रामस्थांना आली.
सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी या भागाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यावरून नागरिक आधीच हादरलेले असतानाच मंगळवारी दुपारी २.३० वाजता वादळीवाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. हळद, केळी, टरबूज, आंबा, संत्र्याचे नुकसान झाले. सोसाट्याचा वारा आणि पावसाने २0 मिनिटे चांगलेच झोडपले. त्यात पाच मिनिटे तुरीच्या आकाराच्या गारांची वृष्टी झाली. त्यामुळे पिकांना फटका बसला. हळद काढत असलेल्या शेतकऱ्यांना गारांचा मारा झेलावा लागला. अनेकांनी शेतात हळद वाळवत ठेवली आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र अधून-मधून ऊन तळपत असल्याने शेतक-यांनी पावसाचा अंदाजच बांधला नाही. त्यांचा हा अंदाच चुकवत गारपीटच झाली. हळदीसाठी एवढे कष्ट उपसून भावही चांगला मिळत नसल्याने संकट वाढतच आहे.
निसर्गाच्या या प्रकोपाची वेगळीच चर्चा ग्रामस्थ करीत आहेत. एकापाठोपाठ एक अशी वेगवेगळी संकटे येत असल्याने हे जगबुडीचे संकेत तर नाहीत, अशाही चर्चा करीत आहेत. त्यामुळे वेगळीच भीतीही निर्माण झाली आहे. घरात बसावे तर भूकंप, बाहेर निघावे तर कोरोना अन् आतातर गारपीटीमुळे शेतातही जावे की नाही? हा नवा प्रश्न पडला आहे. एकंदर व्हॉटस्अॅपवर फिरणाºया त्या विडंबनात्मक संदेशाप्रमाणे अवस्था प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे.