कळमनुरी (जि. हिंगोली) : आरोपीकडून कर्जवसुली आणि बदनामी या सततच्या त्रासामुळे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील योगेश गोरे यांनी कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडीजवळ ११ जून रोजी आत्महत्या केली़
याप्रकरणी दोघांविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात पतीस आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह महिलेवरील अत्याचारप्रकरणी क.३0४, ३७६, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला आहे. मालेगाव येथील सदर मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नारायण काबरा, संजय भुतडा या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ आरोपीने दिलेल्या कर्जाची मयतास सतत मागणी करून त्यांनी चार-चौघांत बदनामी करून त्यांच्या अडत दुकानवर येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्यावर जास्त कर्ज झाले आहे़ तो तुमचा माल घेऊन पळून जाईल, अशी बदनामी केली़ मयताची पत्नी ही घरी एकटीच असताना तिच्यावर संजय भुतडा याने जबरदस्तीने अत्याचार केला़ याबद्दल कोणाला सांगितल्यास दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली़ पीडित महिलेने पतीस घडलेला प्रकार सांगितला़ याचा पतीला मानसिक धक्का बसला होता.
आपल्या मोबाईल व्हॉटस्पवर आपल्या मुलास संदेश पाठविला़ त्यात त्याने नारायण काबरा व संजय भुतडा व अन्य काही लोकांनी दुकानाची बदनामी करून ग्राहकी बंद केली़ यामुळे मला ही वेळ आली, असे संदेशात म्हटले होते. त्यांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून जावून योगेश गोरे यांनी ११ जून रोजी जटाळवाडीजवळ नाल्यालगत असलेल्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद त्यांनी दिली.