- दयाशिल इंगोलेहिंगोली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या संकटातही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी जबाबदारीने कर्तव्य बजावीत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडून सध्या जिल्हाभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, अनेक ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची सुविधा नाही. त्यात पावसाळा असल्यामुळे नदी, ओढे व नाल्यांना पाणी आहे. त्यामुळे नदी व ओढ्यातूनच कर्मचाऱ्यांना कसरत करीत गावात पोहोचावे लागत आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद या गावात लसीकरणासाठी जाण्यासाठी अजूनही आरोग्यच कर्मचाऱ्यांना पूर्णा नदीचे पात्र ओलांडून जावे लागते. पेरजाबाद गावाची लोकसंख्या जवळपास चौदाशे आहे. विकासापासून कोसो दूर असलेल्या या गावात रस्त्याअभावी ग्रामस्थांचे हाल होतात. त्यात नदीला पूर आल्याने गंभीर रूग्ण घेऊन जाताना विविध अडचणींणा तोंड द्यावे लागते. सध्या शाळा बंदमुळे अडचण नसली तरी, एरवी नदीला पूर आल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहचता येत नाही. विशेष म्हणजे एकीकडे कोरोना सारखी महामारी असूनही गरोदरमाता व बालकांच्या लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी धडपड आहेत. कोरोनाच्या महामारीतही आरोग्य कर्मचारी कर्तव्य पार पाडताना दिसून येत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जि़प़जिल्हा आरोग्य विभागातर्फे सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे़ हिंगोली जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३२ उपकेंद्र तसेच ३ ग्रामीण रूग्णालय, २ उपजिल्हा रुणालय व १ जिल्हा रुग्णालय, तसेच ३ नागरी दवाखाने यासह अंगणवाडीत सोशल डिस्टन्सचे पालन करून लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणामुळे माता व बालकांचे विविध आजारापासून संरक्षण होते़ त्यामुळे गरोदर माता आणि बालकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिवाजी पवार यांनी केले आहे़ शिवाय कोरोना महामारीच्या संकटात कर्तव्य बजावताना कोणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत.
पावसाळ्यात नेहमीच करावी लागते कसरतऔंढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा बाजारअंतर्गत पेरजाबाद हे गाव येते. या गावी लसीकरणास जाण्यासाठी नदी आडवी असल्याने पावसाळ्यात नेहमीच आरोग्य कर्मचाऱ्यांना कसरत करीत जावे लागते. पेरजाबादला जवळा बाजार ही बाजापेठ आहे, तसेच औंढा तहसीलला यायचे असल्यास साळणामार्गे २५ किलोमीटर फेऱ्याखाली जावे लागते. त्यामुळे जवळा बाजार येथे ग्रामस्थांना जायचे असल्यास येथील ग्रामस्थ नदीपात्रातूनच ये-जा करतात. गावकऱ्यांची पूल उभारण्याची मागणी असली तरी याठिकाणी अद्याप पुलाचे काम झाले नाही, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.