सेनगाव ( हिगोली ) : हिंगोली ते रिसोड मार्गावर कोळसा शिवारात राजस्थानातून हैदराबादकडे मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक शनिवारी ( दि.२१ ) पहाटे चार वाजता उलटला. या अपघातात ट्रक मधील एका मजूराचा मृत्यू झाला असून ८० मेंढ्याही दगावल्या आहेत. तर गावकऱ्यांच्या सतर्कतेने पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. घटनास्थळी सेनगाव पोलिस दाखल झाले आहेत. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सेनगाव येथे पाठविले आहे. ( The truck overturned as the driver lost control; Eighty sheep, including a laborer, were killed near Sengaon of Hingoli District )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातून एक ट्रक (क्र.एमपी-३३ -एच ७४५५ ) १८० मेंढ्या घेऊन हैदराबादकडे निघाला होता. या ट्रकमधे पाच मजूर देखील होते. ट्रक आज पहाटे चार सुमारास हिंगोली ते रिसोड मार्गावर कोळसा शिवारात आला असतांना चालक सत्येंद्रसिंह चव्हाण (रा. मध्यप्रदेश) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जाऊ उलटला. यावेळी मोठा आवाज झाल्याने कोळसा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी अपघातात किरकोळ जखमी झालेल्या चालकासह पाच मजुरांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, अमरसिंह (५०, रा. टोक, राजस्थान) या मजुराचा मृत्यू झाला. अमरसिंह हा ट्रकमधे मागील बाजूस बसला होता. मेंढ्याखाली दबून गुदमरून तो ठार झाला. अपघातात ट्रकमधे असलेल्या १८० पैकी ८० मेंढ्याही दगावल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभय माकणे, जमादार कामाजी झळके, एस. डी. नरवाडे यांनी भेट दिली आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सेनगाव येथे पाठविले आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.