हिंगोली : मराठवाडा, विदर्भासह सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन लिलाव पद्धतीवरून १७ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास गोंधळ उडाला. ऑनलाईन लिलाव पद्धतीला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवित रोष व्यक्त केला. कृउबा समितीने खरेदीदार, आडते आणि शेतकऱ्यांत मध्यस्थी केल्यावर सुमारे दोन तासानंतर मार्केट यार्ड सुरळीत सुरू झाले.
येथील संत नामदेव हळद मार्केट यार्डात १७ एप्रिल रोजी हळदीचा लिलाव असल्याने हिंगोलीसह परिसरातील जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी हळद विक्रीला आणली होती. आत्तापर्यंत मार्केट यार्डात ऑफलाईन पद्धतीने हळदीचा लिलाव झाला. सोमवारी मात्र खरेदीदार, आडते यांनी ऑनलाईन पद्धतीने लिलाव सुरू केला. शेतकऱ्यांना या लिलावाची कुठलीही माहिती दिली नसताना अचानक ऑफलाईनवरून ऑनलाईल लिलाव करण्यात येत असल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. ऑनलाईन पद्धतीने लिलाव होवू देणार नसल्याचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे आडते, खरेदीदारांना लिलाव प्रक्रिया बंद करावी लागली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय गाठत ऑफलाईन पद्धतीने लिलाव करण्याची मागणी केली. त्यानंतर कृउबाचे सचिव नारायण पाटील यांनी खरेदीदार, आडते व शेतकऱ्यांशी एकत्रीत चर्चा केली. त्यानंतर पुर्वीप्रमाणे ऑफलाईन लिलावाला सुरूवात झाली. ऑफलाईन, ऑनलाईनच्या या गोंधळात मात्र हळद लिलाव प्रक्रिया दोन तास खोळंबली होती.
दहा हजार कट्ट्यांची आवक...येथील संत नामदेव हळद मार्केट यार्ड सर्वदूर प्रसिद्ध असून, १७ एप्रिल रोजी मराठवाड्यासह विदर्भातील यवतमाळ, वाशिम येथून हळद विक्रीसाठी आली होती. या दिवशी हळदीच्या दहा हजार कट्ट्यांची आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.