- विजय पाटील हिंगोली : मागील तीन ते चार वर्षांत पहिल्यांदाच हळदीला नीचांकी दर मिळू लागल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. साडेचार हजारांपर्यंत हळद खाली उतरली असून, तेवढा तर प्रतिक्विंटल शेतकऱ्यांचा लागवड खर्चच आहे. त्यामुळे वर्षभर राबूनही शेतकऱ्यांच्या हाती धुपाटणेच येत आहे. मागील तीन ते चार वर्षांत शेतकऱ्यांना सरासरी सात ते दहा हजारांपर्यंत भाव मिळायचा. मात्र यावर्षी हळद काढणीच टाळेबंदीच्या काळात झाली. ती बाजारात आणताच सुरुवातीला पाच ते साडेपाच हजार व आता चक्क साडेचार हजारांपर्यंत दर घसरला आहे. तुरळक शेतकऱ्यांनाच पाच हजारांवर भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांत हळद खरेदी होते. हिंगोलीत साधारण दोन लाख क्विंटल, वसमतला ४ लाख क्ंिवटल, जवळ्यात एक लाख क्विंटल, सेनगावातही जवळपास ५0 ते ७0 हजार क्विंटल हळदीची आवक होते. ही परिस्थिती मागील दोन-तीन वर्षांतच झाली आहे. यापूर्वी एवढी आवक नसायची. विदर्भातूनही हळद येण्याचे प्रमाण वाढले. उसाची शेती कमी झाल्यानंतर याची जागा बहुतांश ठिकाणी हळदीने घेतली. आवक वाढली तसे दरही घसरत गेले आहेत.
२00८-0९ मध्ये २६ हजारांचा दरपाच वर्षांत हळद पिवळे करून सोडते, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. हा सुवर्णयोग २00८ मध्ये आला होता. हळदीचे दर चक्क २६ हजारांपर्यंत गेले होते. साधारण हळदही १८ ते २0 हजार रुपये क्विंटलने विकली गेली होती. त्यानंतर हळदीचे क्षेत्र झपाट्याने वाढले. दर मात्र घसरतच गेले.
शेती परवडेल कशी?कुरुंदा येथील शेतकरी विष्णू राजे म्हणाले, आमची तिसरी पिढी हळदीचे उत्पादन घेत आहे. यापूर्वी हळद परवडायची. निम्मा तरी नफा मिळायचा. रासायनिक खत, न्यूट्रियंटस्, खोडअळीसारख्या प्रकारावर फवारणी, निंदण, बेड पद्धतीत वाढलेला लागवड खर्च, ठिबक, काढणीचे वाढलेले दर हे सर्व पाहता प्रतिक्ंिवटल खर्च साडेचार हजारांवर गेला आहे. एकरी पंधरा ते वीस क्ंिवटल उत्पादन होते. दर पाच हजारांच्या आत आल्यावर ही शेती परवडणार कशी, हा त्यांचा सवाल.
... तर भाव वाढेलव्यापारी प्रशांत सोनी म्हणाले, दर आमच्या हातात नसतात. यापूर्वी हळदीचे क्षेत्र कमी होते. आवक कमी असायची. आता क्षेत्र अन् आवक वाढली. गुणवत्ता वाढली नाही. निर्यातही घटली आहे. निर्यातक्षम माल थेट सांगलीला जातो. त्याला दरही चांगला मिळतो. सध्या टाळेबंदीत प्रक्रिया उद्योग बंद आहेत. स्थानिक मजुरांचा खर्च वाढला. टाळेबंदी उठली तर भावात बदल पाहायला मिळू शकेल. दोन-तीन वर्षांत पहिल्यांदाच हळद पाच हजारांच्या खाली उतरली आहे.