‘लहान झाडांना काठीचा आधार द्यावा’
हिंगोली: वादळीवारा, मेघगर्जना तसेच पावसाची शक्यता पाहता नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना काठीचा आधार देणे आवश्यक आहे. वादळी वाऱ्यामुळे लहान झाडे पडणार नाहीत, याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. फळे काढणीस आलेली असल्यास सकाळी काढणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
‘शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करावी’
हिंगोली: उन्हाळी हंगामामध्ये लागवड केलेल्या भाजीपाला पिकांमध्ये पाण्याचा ताण बसणार नाही, याची दक्षता भाजीपाला उत्पादकांनी घ्यावी. काढणीस तयार असलेल्या कांद्याची काढणीही लवकरात लवकर करुन घेणे गरजेचे आहे.
पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन
हिंगोली: वादळी वारे व पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जनावरे उघड्यावर तसे पत्राच्या शेडमध्ये बांधू नये. वादळीवाऱ्यामुळे पत्रे खाली पडण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरांना इजा पोहोचू शकते. शेतकऱ्यांनी जनावरे चांगल्या ठिकाणी बांधून त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कडबा भीजणार नाही याची काळजी घ्यावी
हिंगोली: पावसाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी कडबा बाहेर ठेवू नये. कडबा भीजल्यास त्याची प्रत खालावते. भीजलेला कडबा जनावरेही खात नाहीत. तेव्हा शेतकऱ्यांनी कडब्यावर मेनकापड झाकावे किंवा पत्राच्या खोलीत कडबा ठेवावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.