कोरोनामुळे शासनाला बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०-३०-४० चे सूत्र ठरविण्यात आले. या सूत्रानुसार दहावी व अकरावीत मिळालेल्या बेस्ट ऑफ थ्री विषयांतील गुण विचारात घेतले जाणार आहेत. तसेच बारावीचे अंतर्गत गुण विचारात घेऊनच बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. अनेक विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर समजतात, तर काही विद्यार्थी अकरावीपासूनच बारावी अभ्यक्रमाच्या तयारीला लागतात. अकरावीचे वर्ष क्लासेसमध्ये घालतात. त्यामुळे अकरावीच्या गुणांकडे दुर्लक्ष होते. आता बारावीचा निकाल जाहीर करताना, अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यात दहावीला कमी गुण मिळाले, तरी बारावीला चांगला अभ्यास करून चांगले क्षेत्र निवडण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या सूत्राचा फटका बसणार आहे. बारावीच्या निकालाविषयी पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही धाकधूक असल्याचे पाहावयास मिळत आहे.
३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!
माझे बारावी सायन्स असल्याने वर्षभर अभ्यास केला. वर्षभराच्या अभ्यासावरच गुण घेऊन उत्तीर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, मागील दोन वर्षांच्या गुणवत्तेवर बारावीचा निकाल जाहीर करणे म्हणजे अपेक्षाभांग आहे. बारावीच्या अभ्यासावरच बारावीचे गुण मिळावेत.
- सुनील शिवाजी खराटे, विद्यार्थी
इयत्ता १२ वी कला विषयाचा पूर्ण अभ्यास केला होता. परंतु परीक्षाच झाली नसल्याने वैयक्तिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यातच १० वी, ११ वीची गुणवत्ता बारावीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे बारावीत केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार आहे.
- अनिल बाबूराव खराटे, विद्यार्थी
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा
इयत्ता अकरावीचे वर्ष विश्रांतीचे समजून अकरावीला कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ३०-३०-४० या सूत्रामुळे काही प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवून आपला अभ्यास कायम ठेवावा.
- प्रा. गजानन आसोलेकर, जिल्हाध्यक्ष, जुक्टा संघटना, हिंगोली
सर्व राज्यभर काही प्रमाणात गुणांची टक्केवारी निश्चित वाढणार आहे. टक्केवारीच्या प्रमाणात गुणवत्ता वाढेल, याबाबत साशंकता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवून यश मिळवावे.
- प्रा. विशाल साहू, कळमनुरी
जिल्ह्यातील बारावीतील विद्यार्थी
सीबीएसई एकूण विद्यार्थी ००
मुले - ००
मुली -००
स्टेट बोर्ड एकूण विद्यार्थी १४३८७
मुले ७९५०
मुली -६४३७