ऑनलाइन लोकमत
कुरूंदा, दि.29 - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दुस-यांदा कुरूंदा भागात धाडसी कार्यवाही करून ३ लाख ५७ हजार रूपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २९ मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास करून अवैध दारू विक्रेत्यांना दणका दिला आहे.
कुरूंदा शिवारातील टोकाई- गिरगाव रस्त्यावर एका शेतात ४ एप्रिल रोजी बनावट दारूचा कारखाना उघडकीस आला होता.त्यावेळी ७ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल सापडला होता. ही कारवाईदेखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक ठिकाणचे बार, वाईन शॉपसह देशी-विदेशी दारूची दुकाने बंद झाली आहेत.
त्या प्रकरणातील आरोपींच्या शोधात हे पथक फिरत होते. त्यामुळे काही दिवसांपासून हे पथक परिसरात ठाण मांडून बसले होते.
दरम्यान, २९ मे रोजी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून कुरूंदा येथील फरार आरोपी शेख फारुख शेख लतिफ याच्या घरातील गोदामावर छापा टाकून दारूच्या १४१ बॉक्ससह ३ लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. तर आरोपीसही अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक के.बी. शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचला होता. या पथकात बी.एल. ओव्हळ, व्ही.व्ही, फुलारी, ए.एम. पठाण, के.एल. कांबळे, पी.एस. तायडे, टी.एस. आडे, राठोड, रफी, किरतवाड, देशमुख, वाघमारे, मोगले, शहाणे, बोईनवाड, पपुलवाड, मोनेर, पवार यांनी सहभाग नोंदविला. तीन जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचाºयांचा यात समावेश होता.
रात्रीपासून हे पथक अनेक ठिकाणी चौकशी करीत होती. कुरूंदा येथील घरावर छापा मारून पथकाने यशस्वी कार्यवाही केली आहे.
दरम्यान, कुरूंदा येथे दोनवेळा अवैध दारूच्या मोठ्या कारवाया झालेल्या असताना स्थानिक पोलीसांना याची माहिती नसल्याने ठाण्याचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.