हिंगोली : जिल्ह्यात एकूण पाच केंद्रावरुन नाफेडने ६ हजार ३०६ शेतकऱ्यांची ३९ कोटी २१ लाख ९८ हजार ३५० रुपयाची ७१ हजार ९६३ क्विंंटल तूर खरेदी केली आहे. मात्र २६ कोटी रुपयांचेच चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले असले तरीही अजून बारा कोटी रुपयांचे चुकारे लटकलेले आहेत. अधून - मधून पाऊस हजेरी लावत असल्याने, बळीराजा आता शेतीच्या कामाकडे वळला आहे. नाफेड केंद्रावर तूर विकण्याच्या नादात तर अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे रेंगाळलेली आहेत. २५ मेपर्यंत तूर विक्री केल्यानंतर चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत शेतीची कामे आटोपून घेण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे. मुख्य म्हणजे आता शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला तो खरिपाच्या पेरणीसाठी खते, बियाणे खरेदीचा. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने नाफेडकडे तूर विक्री केली. मात्र शेवटी पेरणीसाठी पैसेच हाती पडलेले नाहीत.
अजूनही पाचही केंद्रांवरील हजारो शेतकरी चुकाऱ्यांसाठी हैराण आहेत. तर काही शेतकऱ्यांनी यंदाही उसनवारी करुन किंवा नातेवाईकांकडून खते, बियाणांसाठी पैशांची जुळवा-जुळव करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र खिशात दमडीही नसलेले शेतकरी केवळ खते बियणाच्या दराचा आढावाच घेत आहेत. त्यात भर म्हणजे बहुतांश बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासंमोर खरीप पेरणीचे मोठे संकट निर्माण झालेले आहे. तर विशेष म्हणजे नोंदणी केलेल्या २० हजार शेतकऱ्यांची तूर खरेदीच केली नाही. अजून तरी वाढीव मुदत मिळालेली नाही. यातील किती जणांकडे तूर आहे, हेही कळायला मार्ग नाही. तर हरभरा खरेदीला मात्र १३ जूनपर्यंत वाढीव मुदत मिळाली आहे. मात्र पेरणीच्या गडबडीत हरभरा विक्रीसाठी कोणत्या शेतकऱ्याकडे वेळ असेल? हा गंभीर प्रश्चच आहे.
अशी करण्यात आली खरेदी हिंगोली जिल्ह्यातील ५ ही केंद्रावर ३१ हजार १७५ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून २५ मे पर्यंत केवळ ११ हजार ४ शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली आहे. यामध्ये हिंगोली येथील केंद्रावर ७७५ शेतकऱ्याची ११ हजार २४९ क्विंटल, सेनगाव केंद्रावर १७१६ शेतकऱ्याची २३ हजार ४८४ क्विंटल, कळमनुरी केंद्रावर १२७९ शेतकऱ्यांची १४ हजार २११ क्विंटल आणि वसमत येथील केंद्रावर ९९७ शेतकऱ्याची ८ हजार १०८ क्विंटल, तर जवळा बाजार येथील केंद्रावर १५३९ शेतकऱ्यांची १४ हजार ९१० क्विंटल तूर खरेदी केली आहे.
अशी दिली रक्कमजवळ्यात ८.१२ पैकी ७.६७ कोटी, वसमतला ४.४१ पैकी ७९.८१ लाख, कळमनुरीत ७.७४ पैकी १.८७ कोटी, हिंगोलीत ६.१३ पैकी २.८१ कोटी मार्केटिंग फेडरेशनने अदा केले. १२ कोटींची गरज आहे.